मायणी (जि. सातारा) : येथील पक्षी अभयारण्य वनक्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांना सुमारे तासभर शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जलद उपाययोजना करूनही एक हेक्टरवरील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
येथील अभयारण्य परिसरातील मायणी- म्हसवड रस्त्याच्या पूर्वेकडील वनक्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्या मार्गावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने त्याबाबतची माहिती वनरक्षक संजीवनी खाडे यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली उपलब्ध असलेल्या वन कर्मचारी व मजुरांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणामध्ये झालेली झाडांची पानगळ सुकलेली झुडपे आणि त्यातच कडाक्याचे ऊन व वारा यामुळे आग वाढत गेली. आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ लागल्याचे जाणवताच खाडे यांनी वनक्षेत्रात आग लागल्याची माहिती फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांना दिली. समाज माध्यमाद्वारे आगीची माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचे व मदतीचे आवाहन करण्यात आले.
त्यानुसार जाधव यांनी येथील विविध व्हॉटस्ऍप ग्रुपवर माहिती प्रसूत करीत तातडीने आग विझविण्यासाठी घटनास्थळी जाण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अनेक तरुण लगोलग घटनास्थळी दाखल झाले. येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी रस्ते बांधकामावरील कंत्राटदाराला पाण्याचा टॅंकर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, तसेच आगीवर माती टाकण्यासाठी अनिल कचरे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. सर्वांनी सुमारे तासभर प्रयत्नांची शिकस्त करून अखेर आगीवर नियंत्रण मिळविले, तरीही सुमारे एक हेक्टरवरील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अनेक वृक्षांना आगीची झळ पोचली. श्रीकांत सुरमुख, सुशांत कोळी, सूरज खांडेकर, धनंजय लिपारे, संदीप लुकडे आदी युवकांनी आग विझविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना मोलाची मदत केली.
प्रवाशाने वेळीच आगीची माहिती दिली. वनकर्मचारी व तरुणांच्या जलद कृतीने आगीवर नियंत्रण मिळू शकले.
- संजीवनी खाडे (वनरक्षक, मायणी)
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.