सातारा : सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांतच या नवीन प्रशस्त वास्तूत शिवकालीन व ऐतिहासिक वस्तू स्थलांतरीत केल्या जाणार असून या प्रशस्त वास्तू संग्रहालयामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
याशिवाय ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचा निश्चय आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केला असून आगामी काळात हा संकल्पही पूर्णत्वास जाणार आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेले कास पठार पाहण्यासाठी देश-परदेशातून पर्यटक हजेरी लावतात. कास पर्यटनवाढीच्या दृष्टीने शिवेंद्रसिंहराजेंनी बोगदा ते अनावळे या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावले आहे. तर कास, बामणोली भागातील १२ दुर्गम गावातील पोच रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जावली तालुक्यातही पर्यटनवाढीसाठी शिवेंद्रसिंहराजेंनी प्रस्ताव तयार करुन त्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक चळवळीलाही उभारी देण्याचे महान कार्य सातत्याने केले आहे. विविध क्रीडा प्रकारात सातारा शहरासह जिल्हाभरातून खेळाडू तयार व्हावेत, यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरिरसौष्ठव, भारोत्तोलन, कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, बास्केट बॉल, फुटबॉल, हॉकी, ऍथलेटीक्स आदी क्रीडा प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून अशा क्रीडा स्पर्धांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे. स्वत: एक उत्तम धावपटू असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी मुंबई, गोवा, सातारा आदीठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले असून मॅरेथॉनमध्ये धावणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. मतिमंद खेळाडूंना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य डेफ क्रिकेट फेडरेशन विरुध्द मराठी सिने कलावंतांच्या प्रदर्शनीय क्रिकेट सामान्याचे तसेच मेढा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे नेटके आयोजन केले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज जिल्हा क्रीडा संकुलात बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या सातारा फेस्टिव्हलमुळे सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातून घडत आहे.
मतदारसंघात चौफेर विकास साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जावली तालुक्यातील महु-हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. उरमोडी, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. पवनचक्क्या, टोलनाके व औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे, यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवेंद्रसिंहराजेंनी केला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त, जळीतग्रस्त, उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांतून हजारो रुग्णांना जगण्याची नवी दिशा दिली गेली.
संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर साथ रोगाने थैमान घातले. आपल्या सातारा जिल्ह्यातही कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी स्वतःला समाजासाठी झोकून दिले. लॉकडाऊनमध्ये हजारो गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. सातारा, जावळी तालुक्यातील असंख्य गावात सॅनिटायझर फवारणी केली. कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ होत होती.
सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत होते अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना ही परिस्थिती आटोक्यात यावी, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हिड केअर सेंटर उभारले. सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज तर उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त होते. हे सेंटर भोसले कुटुंबीयांनी विना मोबदला कोरोना बाधितांच्या उपचारासाठी प्रशासनाकडे सुपूर्द केले. मेढा रुग्णालयात ही शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून ३० बेडचे सेंटर सुरु झाले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता आपले कर्तृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.