खंडाळा (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटाच्या सातव्या वळणावर दत्तमंदिर कॉर्नरजवळ काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मालट्रकने (क्र. एमएच 10 सीआर 5550) अचानक पेट घेतला तर, ट्रकमधील पावडरने पेट घेतल्याने मालट्रकच्या मागे असणाऱ्या कारनेही (क्र. एमएच 12 व्ही एफ 2685) पेट घेतला. घाटात लागलेल्या वणव्यामुळे या गाड्या जळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वाहतूक बोगद्यामार्गे वळविण्यात आली.
या वेळी जळालेल्या गाड्यांतून धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. मात्र, सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. जखमी कोणीही झाले नाही. मात्र, या दोन्हीही गाड्या पूर्ण जळून खाक झाल्या आहेत. अज्ञाताने घाटात वणवा लावल्यानंतर भर उन्हात या वणव्याने रौद्ररूप धारण केले. या वेळी वाऱ्याचा वेगही खूप होता. वणवा हा घाटरस्त्याच्या खालच्या बाजूने आल्यामुळे गाड्यांचा अग्नितांडव झाल्याची माहिती खंडाळा पोलिसांनी दिली. यातील मालट्रक चालक परमेश्वर चंद्रकांत पांढरे व गणेश चंद्रकांत पांढरे (दोघे रा. नरेगाव, ता. चाकूर, जि. लातूर) व कारचालक विश्वास गणपती वायदंडे (रा. पेठनाका, ता. कऱ्हाड) हे सुदैवाने या आगीमधून बचावले.
मालट्रक स्टेकेबल ब्लिचिंग पावडर घेऊन भडोच (गुजरात) वरून एमआयडीसी शिरोली (कोल्हापूर) येथे जात होता. कारचालक देहूरोड पुण्यावरून कऱ्हाडकडे निघाले होते. दरम्यान, या अपघातस्थळी तत्काळ खंडाळा पोलिस स्टाफ, भुईंज टॅब स्टाफ व हायवे कर्मचारी उपस्थित झाले. लगेचच वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. खंडाळा येथील युवराज ढमाळ यांनीही पाण्याचा टॅंकर पाठवला व आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या काळात पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक खंबाटकी बोगद्यातून विरुद्ध बाजूने वळवण्यात आली.
या अपघातावेळी पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस संभाजी पोळ, विठ्ठल पवार, यादव, होमगार्ड, भुईंजचे पोलिस व महामार्ग पोलिस यांनी घटनास्थळी तत्काळ पोचून मदतकार्य सुरू केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस संभाजी पोळ करीत आहे. तालुका वनक्षेत्रपाल हर्षा जगताप यांना विचारले असता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी जाळपट्टा काढण्यात आला होता. यापुढे असे घडू नये, म्हणून 15 फुटांऐवजी 30 फुटांपर्यंत येणाऱ्या जानेवारीमध्ये घाट रस्त्याच्या बाजूने व घाटात जाळपट्टा काढला जाईल, असे स्पष्ट केले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.