पोलिसांच्या नाकावर टिचून वाईत बगाड यात्रा; बावधनातील 104 जणांवर गुन्हा, 83 जणांना अटक

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

वाई (जि. सातारा) : जिल्हा प्रशासनाने यात्रेवर घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून बगाड मिरवणूक काढल्याप्रकरणी बावधन (ता. वाई) येथील 104 जणांवर शुक्रवारी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी 83 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सकाळी बगाड गावात पोचल्यानंतर मंदिरातून आलेल्या 25 ते 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दिवसभर धरपकड सुरू होती. तहसीलदार रणजित भोसले यांनी याबाबतची तक्रार दिली असून, बगाड्या, बगाडावर उभे असलेले आणि बैल ओढणारे मानकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. दोन ट्रक्‍टरही ताब्यात घेतले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रेवर घातलेले निर्बंध धुडकावून "काशिनाथाच्या नावाचं चांगभलं'च्या गजरात आणि सनई वाजंत्रीच्या निनादात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. संपूर्ण गावात संचारबंदी आणि प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी अत्यंत गोपनियता पाळून गमिनी काव्याने बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली. बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर केला होता. मात्र, सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व यात्रा- जत्रांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यानुसार बावधनची बगाड यात्रा रद्द करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढला होता. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला होता. याबाबत स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयात बैढक घेऊन तशा ग्रामस्थांना सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गावात कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेली आठ दिवस गावात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. सहायक पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाची एक तुकडी व आवश्‍यक पोलिस असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. 

होळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात कौल लावून बगाड्या ठरविण्यात येतो. प्रशासनाला गाफील ठेऊन होळी पौर्णिमेच्या रात्रीच कौल लावून बगाड्याची निवड करून त्याला गावाबाहेरील एका मंदिरात ठेवण्यात आले होते, अशी चर्चा परिसरात सुरू होती. आज पहाटे कृष्णा तीरावरील सोनेश्वर येथून बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्यास नदीत स्नान घालून देवतांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळ्यावर चढविण्यात आले. बगाड रथाच्या मागे वाघजाई देवी, भैरवनाथ व जोतिबाची पालखी होती. बगाड मिरवणूक पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी बगाड मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे दहा ते 12 हजार भाविकांचा जनसमुदाय होता. त्यामुळे पोलिस आणि स्थानिक प्रशासन हतबल झाले होते. 

बगाड निघाल्याची माहिती मिळताच सकाळपासूनच अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत होते. ग्रामस्थांबरोबरील संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने बगाड गावात येऊ दिले. सकाळी साडेनऊच्या सुमारास बगाड गावातील भैरवनाथ मंदिराजवळ पोचले. मंदिरातील धार्मिक विधी झाल्यानंतर बगाड मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर मंदिरातून आलेल्या 25 ते 30 जणांना पोलिसांनी शासनाच्या आदेशाचा व नियमांचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतरही दिवसभर धरपकड सुरू होती. 

अनेकांवर संचारबंदी व आपत्कालीन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी पोलिसांनी बगाड मिरवणूक काढल्याबद्दल यात्रा समितीवर गुन्हा दाखल केला होता. या वर्षी ग्रामसभा न झाल्याने यात्रा समितीच स्थापन करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. त्यामुळे यात्रेचे नियोजन कोण आणि कसे करीत आहे हे कोणालाच समजत नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यात्रा, उत्सव साजरे करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते, तरीही नियमभंग करून बगाड यात्रा पार पाडली. शासनाच्या नियमानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी दिली. 

बगाड यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. प्रशासनाबरोबर अनेक वेळा सल्लामसलत करूनही ग्रामस्थांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. 

-धीरज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.