फलटण शहर (जि. सातारा) : देवी अहिल्याबाई होळकर या कुठल्याही राजकीय पक्षाच्या अथवा समुदायाच्या नाहीत, त्या समाजातील सर्व घटकांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत राजकारण आणणे उचित नाही. देवी अहिल्याबाई या सर्व समाजासाठी पूज्य आहेत, सर्वत्र त्यांचा सन्मान केला जातो, याचा कुणालाही विसर पडता कामा नये, असे मत अहिल्याबाई होळकर यांचे वंशज यशवंतराव होळकर यांनी केले.
फलटण येथे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या "जय व्हिला' या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थिती होती. जेजुरी हे लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. त्यांच्या पायाशी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा असणे ही समाजासाठी महत्त्वाची बाब आहे. तेथे येणारे लाखो भाविक प्रथम मॉं साहेबांना वंदन करतील, मग दर्शनासाठी जातील, यामध्ये आपणास कुठलेही राजकारण दिसत नसून केवळ सेवाभावच दृष्टीस येत आहे, असे होळकर यांनी स्पष्ट केले.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, ""समाजातील लोक साधे व प्रामाणिक आहेत. त्यांना एक संधी मिळायला हवी. जनतेची व समाजाची प्रगती झाली पाहिजे व या प्रगतीसाठी कोणता मार्ग योग्य आहे, याचा विचार व्हायला हवा. समाजाच्या हित व प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे.'' फलटण तालुक्यातील मुरुम हे गाव मल्हारराव होळकर यांची जन्मभूमी आहे. या गावाचे प्रश्न काय आहेत, कुठल्या विकासकामांची तेथे गरज आहे, हे तेथील लोकांना भेटून समजून घेणार आहोत. त्यानंतर तेथे काय करता येईल, हे आपण पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या हस्ते अनावरण योग्यच
जेजुरी गडावरील देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. देवी अहिल्याबाई होळकर यांचा नावलौकिक ते पुढे नेत असतील तर ते योग्यच करीत आहेत, असे सांगून पवार यांनी अहिल्याबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचे होळकर यांनी समर्थन केले.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.