अरे बापरे! हा तर मृत्यूचा सापळाच

patan
patan
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- पाटण मार्गावरील मंद्रुळकोळेजवळच्या वांग नदीवर नवीन पुलाच्या बांधकामाला मुहूर्त न मिळाल्याने सध्या अत्यंत धोकादायक स्थितीतील जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. अवजड वाहतूक आणि सततच्या पुराच्या तडाख्यामुळे कुमकुवत झालेल्या या पुलावर मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच बांधकाम विभागाने आवश्‍यक पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

ढेबेवाडीहून पाटणकडे जाण्यास घटमार्गे रस्ता आहे. येथून मंद्रुळकोळे व मालदनमार्गे त्यास जोडणारे रस्ते जातात. पाटण हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने ढेबेवाडी विभागातील नागरिकांची विविध कामानिमित्ताने तिकडे वर्दळ असते. वाहतुकीची गैरसोय ओळखून मंद्रुळकोळेजवळ वांग नदीवर 1965 मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक असते. पावसाळ्यातील महापूर आणि त्याबरोबरच वाहून येणाऱ्या मोठ्या झाडांच्या तडाख्याने पूल कमकुवत झाला आहे. पुलाखालील दगडी पिलरलाही नुकसान पोचले आहे. 

सध्या पुलावरील स्लॅब उखडला असून, दोन्ही बाजूला संरक्षणासाठी लावलेले लोखंडी अँगल पुरातील झाडांच्या तडाख्याने वाहून आणि तुटून गेले आहेत. सध्या तेथे अत्यंत धोकादायक स्थितीत सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत असतानाही बांधकाम विभागाचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत. मध्यंतरी संबंधितांनी पुलाच्या दुतर्फा लावलेले धोक्‍याबाबतचे सूचना फलक आणि बांधलेले बांबू गायब असून, पुलाचा मूळ धोका कायम आहे. 



...तर वाहन थेट नदीपात्रातच 

या धोकादायक पुलावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मंद्रुळकोळे खुर्द, साबळेवाडी परिसरातील अनेक वाड्यावस्त्यांतील विद्यार्थी, नागरिक तेथूनच ये-जा करतात. पुलाचे रेलिंग तुटलेले आहे. शिवाय नदीच्या बाजूचा स्लॅब उखडल्याने त्यात वाहन गेल्यास थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती आहे. नवीन पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मध्यंतरी सांगण्यात येत होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे समजले नाही. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.