गुड न्यूज....कोरोना संसर्ग काळात रुजतोय "एक गाव, एक गणपती' पॅटर्न

Satara
Satara
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात दरवर्षी गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. संबंधित मंडळांकडून दरवर्षी विविध उपक्रमही राबवले जातात. यंदा या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत "एक गाव, एक गणपती' पॅटर्न राबण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्धार केलेला आहे. त्यासाठी गावोगावी पोलिसांकडून जनजागृती सुरू आहे. त्याला चांगले यशही येत आहे. आत्तापर्यंत 522 गणेश मंडळांनी निर्धार केला आहे. त्यात आणखी गावांची भर पडून एक हजार गावांत "एक गाव, एक गणपती' करण्याचे प्रयत्न पोलिसांमार्फत सुरू आहेत. 

सातारा जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव हा औत्सुक्‍याचा विषय असतो. दरवर्षी गणेश मंडळे आपल्यापरीने खर्च करून सामाजिक उपक्रम, विविध शिबिरे, समाजोपयोगी कार्यक्रम, आरास, लायटिंग व देखावे सादर करतात. त्याला स्पीकर सिस्टिमचीही जोड देण्यात येते. त्यामुळे उत्सव काळातील ते दिवस मंतरलेले असतात. या उत्सवाला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. महामारीच्या आजाराने सध्या डोके वर काढल्याने मोठे आर्थिक संकट सर्वांपुढेच उभे आहे. अनेकांचे रोजगार गेले, अनेकांना नोकऱ्यांनाही मुकावे लागले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने अनेकजण एकत्र आल्यावर त्याचा प्रसार होत आहे. त्याचा विचार करून सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली आहे. परिणामी यंदाच्या उत्सवावर त्याचे सावट आहे.

यंदाचे आर्थिक संकट आणि कोरोनाची महामारी याचा विचार आता गावोगावच्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही सुरू केला आहे. त्यामुळेच सध्याच्या या संकटाच्या काळात अनेक गावच्या गणेश मंडळांनी "एक गाव, एक गणपती' या पोलिसांच्या उपक्रमाला पाठबळ देण्याचा निर्धार केलेला आहे. उत्सव काळात होणारा खर्च हा सामाजिक उपक्रमांसाठी वळवण्यासही अनेक मंडळांनी तयारी दर्शवलेली आहे. तर काही गणेश मंडळांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महामारीच्या संकटाच्या काळात स्वयंस्फूर्तीने मंडळांनी राबवलेला हा उपक्रम खरोखरच आदर्शवत ठरत आहे. 

""कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा. मंडळांनी "एक गाव, एक गणपती' या गृह विभागाच्या उपक्रमास साथ देऊन सहकार्य करावे.'' 

-शंभूराज देसाई, 
गृहराज्यमंत्री 
 
""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "एक गाव, एक गणपती'चा निर्धार केला आहे. मंत्री महोदय व पोलिस जागृती करत आहोत. जिल्ह्यात 800 ते हजार गावांत हा उपक्रम राबवला जाईल, असे प्रयत्न सुरू आहेत. मंडळांनी उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमांकडे वळवावा.'' 

-धीरज पाटील, 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सातारा 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.