कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काहींना जीवासही मुकावे लागले आहे. हे गंभीर वास्तव दैनिक "सकाळ'ने अनेकदा मांडले. त्याचा विचार करून आता उद्योजक, व्यापारी, इंजिनिअर, डॉक्टर सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना आवश्यक सेवा देण्यास पुढे येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडचे दहा तरुण उद्योजक, व्यापाऱ्यांनी पुढे येत ऑक्सिजन ग्रुप तयार केला. त्यांनी 12 ऑक्सिजन यंत्रे स्वखर्चाने घेऊन ती कऱ्हाड-पाटण तालुक्यात धाप लागलेल्या रुग्णांना विनामूल्य देण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे. त्यांचा हा ग्रुप कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनीच ठरला आहे.
कोरोनाची गंभीर स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील आबालवृध्दांना लक्षणे दिसल्यावर त्यांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, यासाठी प्रशासनाकडून ऍन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतही कोरोना टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या प्रमाणात जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामध्ये 50 वर्षांपुढील रुग्णांची संख्या जास्त आहे.
बेडच उपलब्ध नसल्याने अनेकांना घरीच ऑक्सिजन लावण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, घरी ऑक्सिजन लावण्यासाठी सिलिंडर मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जीव गेल्याच्याही घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यासंदर्भातील वास्तव स्थिती दैनिक "सकाळ'ने वेळोवेळी मांडली. या गंभीर स्थितीचा विचार करून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो आणि ऑक्सिजनअभावी कोणाचा जीव जावू नये, यासाठी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या चर्चेतून कऱ्हाडमधील भूषण शाह, संदीप कोटणीस, ईश्वर जैन, राकेश शाह, अनुप शाह, राहुल सोनी, स्वप्नील शाह, राजू मुथा, सुरेश देढीया, शशिकांत मोरे (पलुस) हे उद्योजक, व्यापारी असे तरुण एकत्र आले. त्यांनी ऑक्सिजन ग्रुप तयार केला आणि कोलकाता येथून ऑक्सिजन यंत्रे स्वखर्चाने विकत घेतली. त्याव्दारे त्यांनी कऱ्हाड-पाटण तालुक्यातील धाप लागलेल्या रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन यंत्रे देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. त्यामुळे घरीच उपचार घेणे शक्य झाले असून रुग्णांचा जीव वाचण्यासही मदत होत आहे. त्यांचा हा ग्रुप कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनीच ठरला आहे.
माणुसकीही धावली
कोरोना काळातील लॉकडाउन स्थितीमध्ये पोलिस उपअधीक्षक गुरव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व शहरातील दानशूरांनी सुरू केलेल्या व भुकेल्या पोटांसाठी आधार बनलेल्या कऱ्हाडच्या माणुसकी या ग्रुपनेही तीन ऑक्सिजन यंत्रे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य गंभीर स्थितीचा विचार करून ती यंत्रे घेतली जाणार आहेत. त्यांच्यामार्फतही ती यंत्रे गरजूंना मोफत देण्यात येणार आहेत.
ऑक्सिजन पाहिजे, संपर्क साधा
ज्या रुग्णांना बेडअभावी घरीच ऑक्सिजन लावायचा आहे. मात्र, त्यांना तो उपलब्ध होत नाही, त्यांनी ऑक्सिजन ग्रुपशी संपर्क साधावा. त्यासाठी त्यांनी 9422039509, 9545454914, 9545577777 या क्रमांकांवर संपर्क साधल्यावर त्यांना उपलब्धतेनुसार मोफत ऑक्सिजन यंत्रे उलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
""समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या चर्चेतून आम्ही समविचारी तरुण एकत्र येत ऑक्सिजन ग्रुप तयार केला. त्याव्दारे आम्ही रुग्णांना घरी ऑक्सिजन यंत्रे देत आहोत. त्यातून काहींचा जीव वाचला तर ही आमच्यासाठी लाखमोलाची बाब आहे.''
-भूषण शाह,
उद्योजक, कऱ्हाड
""कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासंदर्भात "सकाळ'नेही सातत्याने वास्तव स्थिती मांडली. रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा जीव जावू नये, यासाठी आम्ही दहा जणांनी पुढे येऊन ऑक्सिजन ग्रुप तयार केला. ती यंत्रे स्वखर्चाने खरेदी करून गरजूंना मोफत देत आहोत.''
-संदीप कोटणीस,
उद्योजक, कऱ्हाड
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.