नागठाणे : वर्षा पर्यटन अन् कास, ठोसेघरचा नयनरम्य निसर्ग हे समीकरण आता सर्वदूर पोचले आहे. मात्र, या पर्यटनाला कित्येकदा बेशिस्त पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे गालबोट लागते. या पार्श्वभूमीवर यंदा अशा ‘अतिउत्साही’ पर्यटकांवर पोलिसांची नजर राहणार आहे.
कासचे निसर्ग पठार अन् ठोसेघरचा धबधबा ही सातारा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे. गेल्या काही वर्षांत ती जगाच्या नकाशावर पोचली आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळांना भेटी देतात. खासकरून पाऊसधारा बरसायला लागल्या, की पर्यटकांची पावले कास, ठोसेघरच्या दिशेकडे वळतात. मात्र, या पर्यटनस्थळांना बेशिस्त पर्यटकांच्या वर्तनाने गालबोट लागल्याच्या कित्येक घटना यापूर्वी पाहावयास मिळाल्या आहेत. पर्यटकांची हुल्लडबाजी हीदेखील वेळोवेळी चिंतेचा विषय ठरली आहे.
विशेषतः परिसरातील स्थानिक रहिवाशांना अशा पर्यटकांचा उपद्रव सहन करावा लागतो. या भागातील गुराखी, महिला, तरुणींना त्याची झळ बसत असते. या पार्श्वभूमीवर राजापुरी (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरे यांनी अशा बेताल पर्यटकांच्या वर्तनावर आळा बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
श्री. मोरे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर याविषयी नोंद केली होती. पावसाळ्याच्या मुख्य हंगामात कास, ठोसेघर या दोन्ही मार्गांवर पोलिस चेकपोस्ट तसेच फिरत्या बंदोबस्ताच्या मागणीचे निवेदन सातारा तालुका पोलिस ठाण्याला दिले होते. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना दोन्ही मार्गांवर पोलिस चेकपोस्ट आणि पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी ‘फिक्स पॉइंट बीट मार्शल’ नेमले जाणार आहेत.
बेशिस्त, बेताल पर्यटकांचा परिसरातील स्थानिकांना अनेकदा उपद्रव सहन करावा लागला आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली आहे.
-प्रशांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते, राजापुरी (मुंबई)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.