कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना "ट्रु व्होटर ऍप' डाउनलोड करणे आणि त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत. उमेदवारांनी माहिती आणि दैनंदिन खर्च दररोज या ऍपमध्ये ऑनलाइन भरावयाचा आहे. निवडणुकीच्या प्रचारास केवळ चार दिवस राहिले असताना निवडणूक आयोगाने घातलेल्या बंधनामुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक ती माहिती वेळोवेळी निवडणूक यंत्रणेकडे द्यावी लागणार आहे. उमेदवारांनी लेखी माहिती देण्याबरोबर आता ऑनलाइनही माहिती देण्यासाठीचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले आहे. त्यानुसार आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना ट्रु व्होटर ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. त्याद्वारे त्यांना आवश्यक ती माहिती व दैनंदिन खर्च त्यावर अपलोड करून बंधनकारक करण्यात आले आहे.
त्याचबरोबर ते लेखी स्वरूपातही निवडणूक यंत्रणेकडे द्यायचा आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत उमेदवारांना सूचना देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारास केवळ चारच दिवस राहिले आहेत. त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यापर्यंत चिन्हे पोचवताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने ऑनलाइन माहिती भरण्याच्या घातलेल्या बंधनामुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.
मतदान बुथचेही मॅपिंग
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी बूथ तयार करण्यात आले आहे. मतदारांच्या संख्येनुसार त्यांची रचना करण्यात आली आहे. संबंधित ऍप निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदारांनाही डाउनलोड करावे लगणार आहे. त्या ऍपमध्ये संबंधित मतदान बूथचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यात मतदान बूथचे आक्षांश, रेखांशही येणार आहेत. त्यामुळे त्याची माहितीही निवडणूक आयोगालाही त्याच वेळी कळणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्ले स्टाेअरवर जाऊन "ट्रु व्होटर ऍप' हे ऍप डाउनलोड करावे, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून दैनंदिन खर्चही दररोज अपलोड करावयाचा आहे.
-अमरदीप वाकडे, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, कऱ्हाड
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.