कऱ्हाड : पालिकेच्या निवडणुकांचा मोसम बेभरवशाचा झाला असला तरी, राजकारणाचा मोसम मात्र, कऱ्हाडात चांगलाच रंगात आला आहे. शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपही कामाला लागले आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव ते पैगंबर जयंतीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक गट आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ दिसत आहे. त्यातून वाद-प्रतिवाद तर शह- काटशहाचे राजकारणही दिसते. ठराविक मंडळांच्या डीजेकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते, तर काहींना सार्वजनिक महाप्रसादालाही परवानगी मिळत नाही, अशा घटना राजकीय हेतूने व दबावाने केल्या जात असल्याने रंगत अधिकच वाढताना दिसते.
येथील पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, आमदार पाटील व भाजप असे तीन प्रमुख गट आहेत. राजकारणावर परिणाम करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या गटालाही तितकेच महत्त्व असल्याचा इतिहास आहे. त्यात माजी उपाध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांना महत्त्व प्राप्त होते. त्यापैकी यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जवळीक साधली असली तरी अद्यापही जाहीर भूमिका घेतली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटासोबत ते गेल्यास भाजपकडेही त्यांच्याशी युती करण्याचा पर्याय खुला राहील. त्यासाठी भाजपमध्येही अतुल भोसले, विक्रम पावसकर व शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यात त्यासाठी एकमत होणे आवश्यक आहे. माजी उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्याभोवतीही अनेकदा राजकारण फिरते.
श्री. पाटील यांनीही सातत्याने विधानसभेला भाजपची साथ दिल्याचा इतिहास आहे. त्यासोबत पालिकेत ते स्वतःचा गट सेफ ठेवण्यात माहिर आहेत. कधी आमदार चव्हाण तर कधी आमदार पाटील यांच्या गटासोबत ते पालिकेच्या निवडणुकीत दिसतात. राजेंद्र यादव व जयवंत पाटील यांच्यातही एकी झाल्याचे पाहिले आहे. अशा स्थितीत श्री. पाटील यांच्याभोवती व्यूव्हरचना आखण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनाच थेट अडचणीत आणले जात आहे. शहरात पैगंबर जयंतीला सर्वांना परवानगी मिळाली.
श्री. पाटील यांच्या समर्थकांनी ठेवलेल्या महाप्रसादालाही (जेवण) पोलिसांनी परवानगी नाकारली. दरवर्षी पैगंबर जयंतीला महाप्रसाद होतो, यंदा मात्र, त्याला परवानगी देताना पोलिसांनी घेतलेल्या आढ्यावेढ्यांना राजकीय किनाराची शहरात चर्चा आहे. त्याशिवाय त्यांच्या समर्थकांच्या निविदांतील कामातही आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. खराब कामे करणाऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने रोखण्याचे होणारे प्रयत्न राजकीय हेतूपोटी होत असल्याच्या तक्रारी आहेत. आमदार चव्हाण यांचाही गट सक्रिय झाला आहे. त्यांचीही चाचपणी सुरू केली आहे. आमदार पाटील यांच्या गटानेही केलेल्या राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.
समर्थकांच्या अडचणी...
कोणत्या नेत्यांचे एकत्रिकरण होणार, त्याच्या हालचाली अद्यापही गतीत नाहीत. मात्र, समर्थकांची मोठी गोची होताना दिसते. अनेक समर्थकांना अडचणीत आणण्याची खेळी होत आहे. त्यामुळे अनेक जण सध्या तरी आपापल्या नेत्याला त्याची माहिती देत आहे. मात्र, नेतेही त्यावर गप्प आहेत. राजकीय समीकरण काय जुळणार? याचा अंदाज नेतेमंडळी घेत असले तरी, समर्थकांची गोची होताना दिसते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.