गोंदवले : गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात नारळी पौर्णिमेची यात्राही रद्द करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसारच पुढील काळात मंदिराची कवाडे भाविकांसाठी खुली करण्यात येतील, अशी माहिती मंदिर समितीने दिली.
मार्चपासून बंद असलेले समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी अजूनही बंदच आहे. येथील मंदिरात दरमहा पौर्णिमेला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यातील गुरुपौर्णिमादेखील रद्द झाली होती. श्रावण महिन्यात भाविक मोठ्या भावनेने देवतांची आराधना करतात. या महिन्यात मंदिरे उघडतील आणि मंदिरात उपासना करण्याची वाट मोकळी होईल, अशी आशा होती. परंतु, अद्यापही कोरोनाचा प्रभाव असल्याने भाविकांची निराशा झाली आहे. येत्या तीन ऑगस्टला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन आहे. त्यावरदेखील विरजण पडल्याची भावना व्यक्त होत आहे.
शासनाने लॉकडाउन शिथिल केले असले तरी धार्मिक स्थळांची बंदी मात्र कायम आहे. त्यामुळे येथील समाधी मंदिरातील नारळी पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. समाधी मंदिरात पुजारी त्रिकाल पूजा-अर्चा करतील. "श्री' महाराजांच्या श्रावणीचा कार्यक्रम हा विश्वस्तांच्या उपस्थितीत होईल. श्रावणी सोमवार असल्याने महादेवास रुद्राभिषेक करण्यात येईल. मात्र, शासनाच्या आदेशानुसार समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.
शासनाच्या निर्णयानुसार समाधी मंदिर अद्यापही बंदच आहे. श्रावणात दर्शनासाठी मंदिरात न येता भाविकांनी घरातूनच "श्रीं'ची उपासना करावी.- विश्वस्त, समाधी मंदिर समिती, गोंदवले
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.