Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र

Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र
Updated on

कऱ्हाड ः वाचनावर अधिक भर दिल्याने त्यातून पाया तयार झाला. प्रत्येक विषयाचे एक- एक पुस्तक बाजारात तयार आहे. अनेक विद्यार्थी पुस्तके वाचण्याच्या मागे लागतात. मात्र कमीतकमी पुस्तके वाचून जास्तीतजास्त रिव्हिजन करणे, हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक आहे. त्यासाठी पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा स्टॅण्डर्ड बुकचे जास्तीतजास्त रिव्हिजन करा, असा सल्ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले प्रसाद चौगुले यांनी "सकाळ'शी बोलताना दिला.
 
ते म्हणाले, ""प्रशासकीय सेवेत मिळणाऱ्या अधिकारांमुळे समाजावर सकारात्मक प्रभाव टाकता येईल, याचा विचार करून स्पर्धा परीक्षेकडे वळलो. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा स्पर्धा परीक्षेत क्वॉलिटी ऑफ स्टडी महत्त्वाची आहे. वाचनावर अधिक भर दिला. त्यातून फाउंडेशन तयार झाले. प्रत्येक विषयाचे एक- एक पुस्तक बाजारात तयार आहे. कमीतकमी पुस्तके वाचून जास्तीतजास्त रिव्हिजन करणे हे स्पर्धा परीक्षेत सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावर पहिल्यापासून माझा भर राहिला. आयोगाच्या संकेतस्थळावरील अभ्यासक्रमाची प्रिंट काढून कोणत्या विभागावर किती भर देते, याचे पाठांतरच केले होते. महत्त्वाचे टॉपिक कोणते, त्याला सोर्स कोणते? हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वीच ठरवले होते. त्यामुळेच पहिल्या प्रयत्नात हे यश मिळाल्याचे समजतो. वर्षभराचा अभ्यासाचा प्लॅन तयार केला. त्यात कोणत्या महिन्यात, कोणत्या आठवड्यात, कोणत्या दिवशी काय करणार, हे सगळे तयार होते. त्यासोबत काही महत्त्वाची शासकीय संकेतस्थळे, काही चालू घडामोडीची मासिके, पुस्तके व सोबत वर्तमानपत्रही वाचल्यास तयारीसाठी खूप फायदा होतो. सकाळी संदर्भ पुस्तके वाचनात घालवायचो, दुपारच्या वेळेत मरगळ आलेली असल्याने वर्तमानपत्रे वाचने, चालू घडामोडींवरील पुस्तके वाचणे, संध्याकाळच्या सत्रात संदर्भ ग्रंथ वाचनात वेळ घालवत होतो. रात्रीच्या सत्रात आयोगाचे पूर्वीचे पेपरचा सराव करण्यावर भर दिला. सातत्याने या अभ्यासाच्या प्रक्रियेत असल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. त्यासाठी छंद ही जोपासले पाहिजेत. त्यासाठी ऐतिहासिक, जिओग्राफीकल डॉक्‍युमेंट्रीज पाहात होतो. शरीराला रिचार्ज करून पुन्हा अभ्यास करणे गरजेचे आहे.''
 
ते म्हणाले, ""दररोज सकाळी 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यास मन प्रसन्न राहते. त्यातून दिवसभरात जितका अभ्यास कराल, तो लक्षात राहण्यास मदत होते. ट्रायल व एरर पद्धती वापरल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एक पूर्व परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास आयुष्यातील अडीच वर्षे आणखी स्पर्धा परीक्षेला द्यावी लागतात. त्यासाठी चांगला मार्गदर्शक निवडा, त्यातून तुमचा वेळ वाचून थेट मार्गदर्शनानुसार अभ्यास केल्यास यश मिळू शकेल. जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी येत आहेत. त्यांनी कोणाचे तरी ऐकून या क्षेत्राकडे येऊ नये. वरिष्ठांशी चर्चा करा, अभ्यासक्रमाची माहिती घ्या आणि मगच यावे. जिद्द, चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी असेल तरच या क्षेत्रात या. आपण इतका वेळ अभ्यास करू शकतो का? यासाठी स्वतःची क्षमता तपासून या क्षेत्राकडे वळा.''
 
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे उपजिल्हाधिकारीपद मिळाले असले, तरी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्यास आवडेल. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे, श्रीकर परदेशी, शेखर गायकवाड यांनी कामातून आदर्श निर्माण केला. प्रशासकीय सेवेतून काय बदल घडवू शकतो, हे दाखवून देणारे हे अधिकारी माझे आदर्श आहेत. त्यांच्या मार्गावरच चालण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. 

प्लॅन बी तयार ठेवा... 

चार- पाच प्रयत्नानंतरही अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांनी जीवनात अनेक क्षेत्रे आहेत, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे या परीक्षेत यश मिळाले नाही म्हणजे सर्व संपले असे होत नाही, याचाही विचार करावा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्लॅन बी तयार ठेवावा, असेही त्यांनी सुचविले.

बहिणीची प्रेरणा घेऊन प्रगती झाली नायब तहसीलदार
 
एमपीएससी परीक्षेत कऱ्हाडच्या प्रसाद चौगुलेचा राज्यात झेंडा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.