महागणपती मंदिराजवळील जुना पूल तसेच खडकी व चिंधवली गावाजवळील जुने पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (ता. दोन) दुपारी ७६५६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदी (Krishna River) दुथडी भरून वाहत असून, तीरावरील महागणपती मंदिरासह अनेक मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे. महागणपती मंदिरात (Mahaganpati Temple Wai) पाणी शिरले आहे.
शहर व परिसरात काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. आज सकाळपासून दिवसभर पाऊस सुरू होता. तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही पाऊस सुरू आहे. काल दिवसभरात धोम-बलकवडी पाणलोट क्षेत्रात १६ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण २०३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात १४९० क्युसेक पाणी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ८०९.७ मीटर झाली असून, पाणीसाठा ३.४४ टीएमसी इतका झाला आहे.
धरण ८४.३९ टक्के भरले आहे. या धरणातून १४१५ क्युसेक पाणी धोम धरणात (Dhom Dam) येत आहे. धोम धरण पाणलोट क्षेत्रात १८ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण ८७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५९२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ७४५.१५ मीटर झाली असून, पाणीसाठा ११.४९ टीएमसी इतका आहे. धरण ८५.११ टक्के भरले आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणांचे चारही दरवाजे उघडून सांडवावरून एकूण ७३७४ क्युसेक व धोम विद्युत गृहातून २८२ क्युसेक असा एकूण ७६५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला आहे. आसरे बोगद्यातून धोम-बलकवडी कालव्यात एकूण २०० क्युसेकने सोडण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी महागणपती मंदिरात पाणी शिरले.
दरम्यान, हवामान विभागाने शनिवारी (ता. तीन) व रविवारी (ता. चार) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पावसाचे प्रमाण व आवकनुसार त्यामध्ये कपात अथवा वाढ करण्यात येईल. धरणातून नदीपात्रात सोडलेला विसर्ग तसेच धरणाखालील मुक्त पाणलोट क्षेत्रामधील आवक यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने मंदिर परिसरातील सर्व दुकानांमधील माल रिकामा करून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
महागणपती मंदिराजवळील जुना पूल तसेच खडकी व चिंधवली गावाजवळील जुने पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाने केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.