कुल्लू जिल्ह्यातील डोभी परिसरात पॅराग्लायडिंग करताना पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
शिरवळ (सातारा) : '15 मिनिटांत पॅराग्लायडिंगमध्ये (Paragliding) माझा नंबर येणार', असा आनंदानं आपल्या बहिणीला मेसेज करणारा सूरज शहा (Suraj Shah) पुढील 15 मिनिटांत अचानक देवाघरी गेल्यामुळं आख्यं कुटुंब शोकसागरात बुडालंय. आई-वडील, बहिणीसह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हृदय हेलवणारा टोहो फोडल्यामुळं उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील (Himachal Pradesh Kullu) डोभी परिसरात रविवारी पॅराग्लायडिंग करताना पडून एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सूरज शाह असं मृताचं नाव असून तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॅराग्लायडर हवेत होता तेव्हा अचानक त्याचा सिक्युरिटी बेल्ट उघडला आणि त्यामुळं तो जमिनीवर कोसळला. स्थानिक लोकांनी सूरज शाह आणि पायलटला तात्काळ कुल्लूतील रुग्णालयात नेलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केलं.
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304 ए अंतर्गत पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळातील प्लास्टिक व्यापारी संजय शहा यांचा मुलगा सूरज संजय शहा (रा. शिरवळ, वय 30) याचा हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली इथं पॅराग्लायडिंग करताना बेल्ट सुटल्यामुळं सुमारे 500 फूट दरीत पडल्यानं शनिवारी उशिरा अपघाती मृत्यू झाला.
सूरजला लहानपणापासून मॅरेथॉन व सायकलिंगची फार आवड होती. तसंच तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. शांत, संयमी, मितभाषी असणारा सूरज हा साताऱ्याचे सुप्रसिद्ध सी. व्ही. दोशी यांचा नातू होता. शहा बंधू अकलूजवरुन शिरवळला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित झाले. यानंतर अत्यंत खडतर परिस्थितीतून वाटचाल करीत आपल्या व्यवसायात हे कुटुंब यशस्वी झालं. सूरज सध्या बंगळुरुला संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. वडिलांचा पुण्याला नोकरी करण्यासाठी आग्रह होता. तसा त्याचा प्रयत्नही सुरु होता. मात्र, अखेर नियतीनं सूरजवर घाला घातल्यामुळं अनेकांनी हळहळ व्यक्त केलीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.