जावळीतील या दुर्गम गावात सामुहिक शेतीचा नारा

jawali
jawali
Updated on

कास (जि. सातारा) ः नाचणी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले असताना जावळी तालुक्‍यातील बामणोली भागातील अंधारी गावात सामूहिक प्रयत्न करून ओसाड डोंगरावर नाचणी फुलली आहे. 

शेतीमधून वर्षभर काबाडकष्ट करूनही पोटापुरते उत्पन्न मिळत नाही. शिवाय रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्याने बामणोली, तापोळा, कास परिसरातील तरुण वर्ग नोकरी- धंद्यासाठी मोठ्या प्रमाणात शहराकडे वळला. परिणामी येथील शेतीचे प्रमाण कमी झाले. मॉन्सूनच्या पावसावर येथे भात व नाचणीची शेती केली जाते. भात शेतीपेक्षा नाचणीच्या शेतीला मेहनत अधिक व उत्पन्न कमी, तसेच जंगली जनावरांचा उपद्रवामुळे नाचणीची शेती खूप कमी होते. 

कोरोनामुळे चार महिन्यांपासून चाकरमानी गावीच अडकून पडले आहेत. गावी भातशेती आहे; परंतु ती खूप कमी आहे. शहराकडे जाईपर्यंत गावासाठी भात शेतीबरोबर नाचणीची शेती करण्याच्या हेतूने अंधारीतील सुरेश शेलार, एकनाथ शेलार, नवनाथ शेलार, दीपक शेलार, ज्ञानेश्वर शेलार, नारायण शेलार, मारुती शेलार, जानू शेलार या आठ शेलार बंधूंनी एकत्र येऊन गावाशेजारील स्व मालकीच्या पडीक ओसाड डोंगरात नाचणीची गट शेती केली आहे. सुमारे तीन एकर जागेवर त्यांनी मार्च महिन्यात पालापाचोळा, तसेच झुडपांपासून तरवे बनवून ठेवले. मे महिन्यात धूळवाफेवर पेरणी करून आलेल्या रोपांमधून नाचणी लागण झाली. 

या परिसरातील अनेक गावांमध्येही लॉकडाउन काळात गावी अडकलेल्या तरुणांनी नाचणीची शेती केली आहे. त्यामुळे यावर्षी नाचणी पिकाच्या क्षेत्रात दहा-बारा वर्षांनंतर प्रथमच वाढ झाली आहे. नाचणीची शेती प्रामुख्याने डोंगर उतारावरच केली जाते. कारण, जास्त पावसाच्या प्रदेशात सपाट जागी पाणी साचून नाचणी कुजते. शिवाय उंचावर जास्त धुक्‍यामुळे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. 


आम्हाला भातशेती कमी आहे. लॉकडाउनमुळे मार्चपासून गावी अडकून पडलो आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नाही. किमान पोटापुरते तरी धान्य मिळावे, यासाठी आम्ही आमच्या मालकीच्या डोंगरात एकत्रित नाचणीची शेती केली आहे. 

- दीपक शेलार , शेतकरी, अंधारी (ता. जावळी) 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.