खंडाळा (जि. सातारा) : पारगाव (ता. खंडाळा) येथे सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांनी केलेल्या "टीम वर्क'मुळे गेल्या 14 दिवसांत एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्यामुळे "कोरोना'ची साखळी तोडण्यात पारगावला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची लढाई सध्या तरी पारगावकरांनी जिंकली आहे. भविष्यातही तेवढीच खबरदारी घेण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.
पारगाव येथे 23 एप्रिल रोजी मुंबईवरून आलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर नऊ जणांना शिरवळ येथे आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 27 एप्रिल रोजी त्याच्या जवळच्या संपर्कातील एकाच दिवसात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ही बातमी कळताच पारगावकरांचे धाबे दणाणले. प्रशासनाने तत्काळ हालचाल करत अनेक उपाययोजना राबविल्या, तर पारगावमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. गावातून एकही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली. अत्यावश्यक सेवेसाठी घरापर्यंत सर्व सुविधा, सॅनिटायझर आदी सुविधा स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे पुरविण्यात आल्या. त्यानंतर 14 आरोग्य पथकांद्वारे दररोजची माहिती अपडेट करण्यासाठी घरोघरी सर्व्हे सुरू ठेवण्यात आला. संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. 60 वर्षांवरील सर्वांची घरोघरी जाऊन शुगर, रक्तदाब तपासण्यात आला. परजिल्ह्यांतून आलेल्या 60 वर्षांवरील सर्वांचे व गरोदर माता यांचे स्वॅब घेण्यात आले. गावातील सर्वांना आर्सेनिक अल्बम-30 च्या होमिओपॅथीच्या गोळ्या मोफत वाटण्यात आल्या.
प्रांताधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला. तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांनी वारंवार भेटी देऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावरून अचानक सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या पारगावात गेल्या 14 दिवसांत एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. यात तालुका, गाव प्रशासन, दक्षता समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, आरोग्य सेविका, सुपरवायझर, प्राथमिक शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
पुणे- बंगळूर महामार्गालगत असलेल्या पारगावमध्ये अद्यापही योग्य ती खबरदारी म्हणून काळजी घेण्यात येत आहे, तसेच तालुक्यात आजपर्यंत शिरवळ, खंडाळा, लोणंदसह इतर गावांत कोरोना बाधित आढळले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक दक्षता समिती व ग्रामस्थांमुळे कोरोना साखळी होऊ दिली गेली नाही, हेही आतापर्यंतच्या कोरोना लढाईचे यश आहे.
शारीरिक अंतराचा उडाला फज्जा
दरम्यान, गेल्या काही दिवसांतील "अनलॉक'मध्ये जवळपास सर्व व्यवहार सुरू झाल्याने बाजारपेठांत शारीरिक अंतराचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे, तर नागरिकही स्वतःहून काळजी घेण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. मात्र, सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.