टेलर बर्ड अर्थात शिंपी पक्षाच्या अंड्यांची घ्या काळजी!, विणीचा काळ अंतिम टप्प्यात

Satara
Satara
Updated on

मायणी (जि. सातारा) : कॉमन टेलरबर्ड म्हणजेच शिंपी पक्षाच्या विणीचा काळ सध्या सुरू असून, परसबागेसह इतरत्र घरट्यांमध्ये निदर्शनास येणाऱ्या अंड्यांची काळजी घेऊन लोकांनी पर्यावरणाचा समतोल साधण्याची गरज आहे. 

घराभोवताल बागेत, वेलींमध्ये घरटे करून राहणाऱ्या शिंपी पक्षाची अंडी ठिकठिकाणी आढळून येत आहेत. ती अंडी अनेकदा नजरचुकीने तर कधी गंमत म्हणून नष्ट केली जातात. सध्या शाळा बंद असल्याने शाळकरी मुले सतत काहीना काही उपद्‌व्याप करत असतात. पक्ष्यांची घरटी निदर्शनास आल्यास ती कुतूहलाने झाडाझुडपातून बाहेर काढण्यात येतात. त्यामधील पक्ष्यांची अंडी काढून फेकून दिली जातात किंवा घरात नेऊन ठेवली जातात. मात्र, ज्या काळात ती अंडी मादी पक्षाकडून ऊबवणे आवश्‍यक आहे. नेमके त्याच काळात ती अंडी मुलांकडून नष्ट केली जातात. त्यामुळे निसर्गातील अन्नसाखळीवर परिणाम होतो. पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे आपल्या परिसरातील निदर्शनास आलेली पक्ष्यांची अंडी सुरक्षित राहतील. याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. 

दरम्यान, शिंपी पक्ष्याबाबत येथील निसर्गप्रेमी दादासाहेब कचरे म्हणाले, ""कॉमन टेलर बर्डचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस असून, हिंदीत तो "दर्जी' या नावाने ओळखला जातो. भारत, श्रीलंका व म्यानमार येथे आढळतो. चिमणीपेक्षा लहान सुमारे 12 सेंटी मीटर लांब असतो. शरीराचा वरच्या बाजूचा रंग पिवळसर हिरवा, खालची बाजू पांढरट, कपाळ व माथा तांबूस विटकरी, पंख व शेपटी तपकिरी, शेपटीची मधली पिसे लांब व टोकदार असून, शेपटी नेहमी उभारलेली असते. चोच लांब, अणकुचीदार, काळपट तर डोळे तांबूस पिवळे असतात. पाय पिवळे किंवा तांबूस पिवळे असतात. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या शेपटीतील मधली लांब पिसे जास्त लांब होतात. तो अतिशय धीट असल्यामुळे पुष्कळदा घराच्या व्हरांड्यातही येतो. लहान किडे, त्यांची अंडी, सुरवंट, अळ्या आदी खातो. शेवरी, पांगारा वगैरे झाडांच्या फुलांतील मधुरस शोषून घेतो. पाने शिवून तो घरटे तयार करतो. त्यासाठी तो चोचीचा सुईप्रमाणे आणि कोळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दोऱ्याप्रमाणे उपयोग करतो. नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. मादी तांबूस अथवा निळसर पांढऱ्या रंगाची तीन- चार अंडी घालते. त्यांच्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात.'' 


संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.