पाचगणी, महाबळेश्‍वरातील खासगी बंगल्यांत अनधिकृतपणे लॉजिंग!

Satara
Satara
Updated on

भिलार (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी घातलेल्या अटी पाहता हॉटेल व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. परिणामी महाबळेश्‍वर आणि पाचगणीत येणारा पर्यटक सध्या खासगी बंगल्यांमध्ये अनधिकृतपणे बिनधास्त वास्तव्य करत असून, अधिकृत हॉटेल व्यावसायिकांची यामुळे "असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. 

ई-पास रद्द करून शासनाने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने पाचगणी आणि महाबळेश्वरकरांनी सुटकेचा श्वास घेतला; परंतु त्यांचे नियम पाळणे म्हणजे मोठे दिव्य असल्याने येथील व्यावसायिक याबाबत नाराज झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांचे ऑनलाइन आरक्षण, वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे, सर्व पर्यटकांची माहिती ऑनलाइन प्रशासनास कळवावी, नोकरांची कोरोना चाचणी बंधनकारक, खोली देण्यापूर्वी आणि पर्यटक गेल्यानंतर खोलीमध्ये औषध फवारणी करावी, तसेच हॉटेल व परिसरात दोन वेळा फवारणी करणे, पर्यटकांची थर्मामीटर व ऑक्‍सिमीटरने तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश द्यावा, हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्क, हातमोजे यांचा वापर करणे आवश्‍यक, वापरलेले हातमोजे, मास्क या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट त्याच पद्धतीने लावली गेली पाहिजे, पर्यटकांत जर कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर अशा पर्यटकांची माहिती प्रशासनास देणे आवश्‍यक, तसेच अशा पर्यटकांना उपचारासाठी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करणे किंवा त्यांची हॉटेलमध्ये स्वतंत्र सोय केली पाहिजे, हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉल बंदच राहील; परंतु जर त्याचा वापर केवळ 15 लोक करणार असतील तर अशा वेळी हॉल सुरू करता येईल. स्वीमिंग पूल हे बंद राहतील. आलेल्या पर्यटकांची येथे येण्यापूर्वी 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती घेतली गेली पाहिजे.

हॉटेलमधील सर्वांनी अंतर राखून काम केले पाहिजे, तसेच समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने रोज नियमित पर्यटक व कर्मचाऱ्यांची माहिती ई-मेलद्वारे तहसीलदारांकडे देणे बंधनकारक आहे, अशा अनेक आणि गुंतागुंतीच्या नियमांमधून मार्ग काढणे व व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. 

सध्या येथील पर्यटनस्थळे लॉकडाउन आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना निवासाव्यतिरिक्त मुक्तसंचार आणि खरेदी ऐवढाच आनंद आहे. ऑनलाइन बुकिंग करताना वय काहीही सांगू शकतात. त्यामुळे येथे येऊन मात्र किचकिच होत आहे. शासनाच्या नियम, अटींच्या अधीन राहून व्यवसाय करणे खूपच अवघड झाले आहे. याचा फायदा खासगी बंगलेवाले घेत आहेत. त्यांना ना नियम वा अटी त्यामुळे हे बिनधास्त आणि मोकाट धंदा करताहेत. याचाही तोटा हॉटेल व्यवसायिकांना सोसावा लागतो आहे. त्यामुळे शासनाने यातील काही अटी शिथिल करून गेले सहा महिने बंद असणाऱ्या व्यवसायास तारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. 

शासनाने ई- पास रद्द केल्याने पर्यटक येत आहेत; परंतु किचकट अटी नियमांमुळे हॉटेल व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आम्हा व्यावसायिकांनी अवस्था "आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना' अशी झाली आहे. एकीकडे शासन पर्यटन खुले करते आहे आणि व्यवसायांवर ढिगभर अटी टाकतेय. यातून व्यावसायिकांचा आता अक्षरशः कोंडमारा होऊ लागला आहे.'' 

- योगेश बावळेकर, हॉटेल सनी 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.