वडूज/बुध (जि. सातारा) : मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एमबीए अशा उच्च पदव्या घेऊन जपानच्या कंपनीत सेवेत राहून आठ ते दहा देशांचे दौरे करणाऱ्या अभियंता युवकाने गेल्या चार महिन्यांत लॉकडाउनच्या काळात चक्क गावच्या शेतीत स्वत:ला झोकून दिले आहे. सौरभ संदेश सातभाई (रा. बुध, ता. खटाव) असे या अभियंत्याचे नाव आहे.
प्रख्यात विधिज्ञ ऍड. संदेश सातभाई व भारतीय विमा महामंडळाच्या येथील शाखेतील अधिकारी श्रद्धा सातभाई यांचा सौरभ हा चिरंजीव आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण वडूजमध्ये झाले. त्यानंतर त्याने सोलापूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व पुण्यात एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कायझेन इन्स्टिट्यूट या जपानच्या कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात तो गेल्या पाच वर्षांपासून सेवेत आहे. कंपनीच्या कामानिमित्त गेल्या पाच वर्षांत त्याची भारतातील विविध राज्यांसह केनिया, घाना, आयव्हरी कोस्ट, थायलंड, इथिओपिया आदी काही देशांत भ्रमंती झाली आहे. सौरभला कंपनीकडून विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
गेल्या चार महिन्यांपूर्वी देशात कोरोना संसर्ग व लॉकडाउन होण्याच्या प्रारंभीच्या काळात तो राजस्थानात मोठ्या कंपनीच्या कामानिमित्त कार्यरत होता. त्या वेळी लॉकडाउन जाहीर होताच कंपनीने सर्वांना घरी जाण्याच्या सूचना केल्या. त्या वेळी त्याने पुण्यातील घरी न थांबता थेट बुध या मूळगावी जाणे पसंत केले. गावाकडील शेतीमध्ये बटाटा, ऊस, आले लागवडीबरोबरच आंबा, नारळ, जांभळ, आवळा अशा फळझाडांच्या जोपासणेकडे त्याने लक्ष दिले. कोणतीही तमा न बाळगता त्याने स्वत:ला शेती कामांत झोकूनही दिले. लॉकडाउनमुळे शेती कामांत लक्ष देण्याबरोबरच कंपनीचे कामही ऑनलाइन पद्धतीने तो येथूनच करीत आहे. उच्चपदस्थ अभियंता युवकाच्या शेतीत झोकून देण्याच्या वृत्तीचे नागरिकांनीही कौतुक केले.
कोरोना संसर्गाने माणसाला आयुष्य जगायला शिकविले आहे. जीवन जगणे सोपे आहे. मात्र, माणसाचे राहणीमान जीवन जगायला अवघड बनविते. कुणीही कोणत्याही पदावर गेले तरी त्याने आपल्या गावाशी व शेतीशी असणारी नाळ कायम ठेवली पाहिजे.- सौरभ सातभाई, अभियंता
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.