पाटण (जि. सातारा) : पाटणला दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत. वाढती संख्या हा चिंतेचा विषय असताना परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून व्यापारी वर्गाने एकत्र येऊन शहरात आठ दिवसांचा लॉकडाउन अंमलात आणला. मात्र, घराच्या चौकटीपर्यंत कोरोना आलेला असताना शहरातील तरुणाई मात्र वाढदिवसाच्या पार्ट्या करण्यात बेभान असल्याचे चित्र शहरात आहे.
15 जून रोजी शहरात कोरोनाची "एंट्री' झाली. त्याचे लोन शहरातील गल्लीगल्लीत गेले. एका दिवसात 12 ते 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले. एकूण बाधितांचा आकडा धडकी भरेल असा वाढू लागला. नगरपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका कोरोना फैलावू नये म्हणून गल्ली बोळात फिरू लागल्या. मात्र, कोरोनाला अटकाव झाला नाही. काही महिने दुकाने बंद असलेल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 11 ते 19 ऑगस्टपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि लॉकडाउनला सामोरे जाण्याची वेळ आली.
एकीकडे प्रशासन व व्यापारीवर्ग कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी झटत असताना दुसरीकडे शहरातील तरुणाई वाढदिवसांच्या पार्ट्यात दंग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फेसबुकवरून वाढदिवसाचा संदेश एकदिवस अगोदर मिळत असल्याने त्याची प्रसिद्धी व्हॉटसऍपच्या माध्यमातून केली जात आहे. वाढदिवसादिवशी पाचपन्नास युवक एकत्र येऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत आहेत. केक कापला, की फटाक्यांची आतषबाजीही होत आहे.
एकत्र आलेले युवक सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर या नियमांना केराची टोपली दाखवित आहेत. सामुदायिकपणे वाढदिवसाचा केक शेअर केला जात आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मांसाहारी भोजन आणि त्यासाठीचे वेगळ्या सॅनिटायझरचाही मनसोक्त वापर होत आहे. हा सर्व प्रकार बिनधास्त चालला असून, शासकीय यंत्रणेसह नगरपंचायतीचे पदाधिकारीही कशाला वाईटपणा घ्यायचा म्हणून काहीही माहिती नसल्यासारखी भूमिका घेत आहेत.
दिवट्यांचे प्रताप घरकर्त्यांना कळत नाहीत?
वाढदिवस असणारा व साजरा करण्यासाठी सहभागी होणाऱ्या युवकांचे राष्ट्रीय आपत्तीत भर टाकणारे हे कर्तृत्व पुरस्काराला प्राप्त आहे. आपले दिवटे काय दिवे लावताहेत हे घरच्या कर्त्यांना अशा प्रसंगात कळत नाही का. शहरात थैमान घालणारा कोरोना आपल्या घरात आपल्या कर्तृत्ववान सुपुत्राने आणावा, यासाठी घरची मंडळी पायघड्या घालत नाहीत ना, अशी शंका येत आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.