दहिवडी (जि. सातारा) : अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यांचा पाढा वाचून मी त्याची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली, यात कसली बदनामी? याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील. सर्वसामान्य जनतेसाठी दाद मागण्याला हे अधिकारी बदनामीचे गोंडस नाव देऊ लागले आहेत. त्या अनुषंगाने भविष्यात महिला आयोग व योग्य न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची धमकी देणे हे अधिकारीपदाला शोभनीय नाही. या धमक्यांना मी भीक घालणार नसल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी स्पष्ट केले.
माणच्या तहसीलदार बाई माने यांनी शनिवार १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीपत्रकाव्दारे अपूर्ण माहितीच्या आधारे महिला अधिकार्यांची बदनामी करीत असलेल्या आरोपाचे संजय भोसले यांनी खंडन केले. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, वाळू वाहतूक करणारे MH 11 AL 5328 हे वाहन मंडलाधिकारी तलाठी यांच्या अहवालानुसार तहसील कार्यालयासमोरील पोलीस कवायत मैदानात जमा केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सदरचे वाहन २३ मे २०२० चे सात ते आठ दिवसानंतर दिसून येत नसल्याची माहिती मिळल्यानंतर मी स्वतः व माझ्यासोबत काही पत्रकारांनी सदरच्या जागेचे व्हिडिओ चित्रीकरण केलेले आहे. या सर्व पुराव्यानिशी ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जर का अधिकाऱ्यांनी जप्त केलेले वाहन त्यांच्याच अहवालानुसार त्याच जागी दिसून येत नसले, तर ते वाहन गेले कुठे? याला अपुरी माहिती कशी म्हणता येईल.
संबंधित व जागेवर नसलेल्या वाहनावर कारवाई सुरू असल्याचा बाई माने यांचा खुलासा हा सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारा व खोटारडा आहे. सदरील वाहनावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, नक्की त्यांनी कोणावर कशी, कोणती कारवाई केले त्यांनी स्पष्टपणे जाहीर करावे. अन्यथा गेली तीन महिने कारवाई झाली नसल्याचे सबळ पुरावे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यास मी तयार आहे. तसेच तहसीलदार यांनी माझी बदली झाल्यानंतर बदनामी सुरू केली असल्याचा केलेला आरोप धादांत खोटा आहे. मी चारा छावणी घोटाळा, त्यातील घेतलेली टक्केवारी, तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक या अनुषंगाने प्रांताधिकारी, तहसीलदार माण यांच्याविरोधात गेली अनेक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केलेल्या आहेत याचा बाई माने यांना विसर पडला असावा.
वाळू प्रकरणातील सदरचे वाहन जप्त केल्यापासून दहा दिवस व मी तक्रार केल्यापासून आजमितीपर्यंतचे फोन डिटेल्स तपासल्यास, सीडीआर काढल्यास 'दूध का दूध और पाणी का पाणी' होऊन जाईल यात कोणतीही शंका नाही. मात्र, यात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणे आवश्यक ठरणार आहे, तरी यांच्या धमक्यांना बळी न पडता अथवा भीक न घालता मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई सुरू ठेवणार आहे. या अनुषंगाने मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे संजय भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.