ओझर्डेच्या जवानाला सिक्किममध्ये वीरमरण; सातारा जिल्ह्यावर शोककळा

जवान सोमनाथ तांगडे हे 2019 ला सेवानिवृत्त झाल्यानंतर चार वर्षांसाठी ते पुन्हा सेवेत दाखल झाले होते.
Soldier Somnath Tangde
Soldier Somnath Tangdeesakal
Updated on

कवठे (सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील सैन्य दलातील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) यांना सिक्किम येथील कॉलिंग पॉंगमध्ये दहा किलोमीटर अंतरावरील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातात उपचार सुरू असताना काल सकाळी सात वाजता वीरमरण आले.

सिग्नल रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून ते कार्यरत होते. 2019 ला सेवानिवृत्त झाल्यानंतर चार वर्षांसाठी ते पुन्हा सेवेत दाखल झाले होते. त्यांच्या पाठीमागे वीरमाता पुष्पा (वय 65), वीरपत्नी रेश्‍मा (वय 35), लहान मुली सिद्धी (वय 11), स्वरा (वय 9) व भाऊ जीवन, विवाहित बहिण शोभा असा परिवार आहे. याबाबतची माहिती कळताच तांगडे कुटुंबीयांनी सोमनाथच्या आठवणींनी हंबरडा फोडला. त्यांच्या निधनाने ग्रामस्थ, मित्रपरिवार व संपूर्ण वाई तालुक्‍यावर शोककळा पसरली. जवान तांगडे हे स्वभावाने अतिशय मनमिळाऊ होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांचे वडील अरविंद तांगडे यांचे 19 जानेवारीला निधन झाले होते. वडिलांच्या धार्मिक विधीसाठी सोमनाथ हे सुटी काढून गावी आले होते. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ते एक महिन्यापूर्वीच 16 मार्चला कर्तव्यावर हजर होण्यासाठी ओझर्डेहून सिक्किमला गेले होते. आठ एप्रिलच्या रात्री बर्फाळ टेकडीवर वीरजवान सोमनाथ तांगडे व त्यांचे दोन सहकारी आपले कर्तव्य बजावत होते. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा, पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात बर्फ पडले.

वाऱ्यामुळे त्यांचे तंबू, खाद्यपदार्थ व स्वयंपाकाचे साहित्य अस्ताव्यस्तपणे उडून गेले. बचावाचे व खाण्याचे कोणतेही साहित्य उरले नसल्याने सोमनाथ तांगडे चक्कर येऊन बर्फातच पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी कॉलिंग पॉंग येथील बराकपूर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर उपचार सुरू होते. मात्र, आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची आज सकाळी सात वाजता प्राणज्योत मालविली. त्यांचे पार्थिव लवकरात लवकर गावी यावे, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याद्वारे संपर्क करण्याचे प्रयत्न ओझर्डे ग्रामस्थांचे सुरू होते. तांगडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा ओझर्डे, माध्यमिक शिक्षण पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे व महाविद्यालयीन शिक्षण किसन वीर महाविद्यालय, वाई येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लष्कराची आवड असल्याने लष्कारात भरती झाले.

Edited By : Balkrishna Madhale

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()