कोरेगावसह तालुक्‍यात कोरोनाचा कहर; सभापती जगदाळेंनी व्यक्त केली चिंता

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाबाधितांच्या तालुक्‍यातील वाढत्या संख्येबद्दल पंचायत समितीच्या झालेल्या मासिक सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची सूचना सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आरोग्य विभागाला दिली. 

सभापती जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, सदस्य डॉ. निवृत्ती होळ, मालोजी भोसले, साधना बनकर, मंगल गंगावणे, शीला झांजुर्णे, सुप्रिया सावंत, शुभांगी काकडे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक गटविकास अधिकारी सुनील भस्मे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तालुक्‍यात सध्या बाधितांच्या संख्येचा आलेख वाढत असून, विशेषतः कोरेगाव, वाठार स्टेशन, अरबवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आरोग्य विभागाने सभागृहापुढे सादर केलेल्या आढाव्यावरून स्पष्ट झाले. 

गेल्या जानेवारीपासून तालुक्‍यात 919 बाधित आढळून आले आहेत, तर 13 जणांचा बळी गेला आहे. सध्या तालुक्‍यात 213 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी 49 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि 164 जण गृहविलगीकरणामध्ये आहेत. आतापर्यंत तालुक्‍यातील सहा हजार 25 जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे सभेपुढे देण्यात आली. त्यावर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची सूचना सभापती जगदाळे यांनी आरोग्य विभागाला दिली. पाणीटंचाई अंतर्गत घोषित केलेल्या गावांचे नळ पाणीपुरवठा योजनेचे ठराव संबंधित ग्रामपंचायतींकडून मागवण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सभागृहास दिली. 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला. त्याचबरोबर सभेत स्वच्छ भारत अभियान, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला आणि शासनाकडील व जिल्हा परिषदेकडील परिपत्रकांचे अवलोकन करण्यात आले. पंचायत समिती सेस अंतर्गत सन 2020-2021 या आर्थिक वर्षामध्ये विविध योजनेंतर्गत निवड केलेल्या लाभार्थींच्या यादीस सभेने मान्यता दिली. उपसभापती साळुंखे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.