नेते-प्रशासनाच्या प्रयत्नांना राज्य सरकारचं हवंय पाठबळ!

नेते-प्रशासनाच्या प्रयत्नांना राज्य सरकारचं हवंय पाठबळ!
Updated on

सातारा : कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी राजकीय नेत्यांसोबतच प्रशासन देखील पूर्ण ताकदाने कोरोना विषाणूचा सामना करत आहे. यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी शेखर सिंह आदी कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्यास मदत मिळणार आहे. मात्र, त्याच्या या प्रयत्नांना राज्य सरकारचे पाठबळही असणे आवश्यक आहे. 

कोरोनाला हरवून पालकमंत्री बाळासाहेब पाटील खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धा म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहेत. कोरोना होण्यापूर्वी व कोरोनामुक्तीनंतरही कोरोनाला हरविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यामुळे लोकांत मिसळून त्याची जागृती करत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर दुसऱ्यांदा पालकमंत्री पाटील यांनी कामाचा श्रीगणेशा केला आहे. सातत्याने कोरोनाची जागृती व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सॅनिटायझरची अत्यंत कमी किमतीत उपलब्धतता करून दिली. सहकार व पणन खात्याचा राज्यभराचा कारभार व सातत्याने मुंबई, पुणे, सातारा असा प्रवास होत असूनही त्यांनी कोरोनाच्या लढ्यात दिलेले योगदान मोठे आहे. सातारला जम्बो कोविड सेंटर व्हावे, यासाठी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका घेऊन कोविड आटोक्‍यात आणण्यासाठी ऍक्‍शन प्लॅन केला. कोरोनाच्या हॉटस्पॉटसाठी स्वतंत्र प्लॅन करण्याचा व तो अंमलात आणण्यास ते आग्रही असतात. 

राज्याचा कारभार करतानाच जिल्ह्यातील कोविडची स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सततची धडपड असते. प्रत्येक तालुक्‍यात वैद्यकीय सुविधा पोचल्या पाहिजेत, याकडे त्यांचा कटाक्ष आहे. कोरोनाच्या जागृतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आरोग्य सुविधा उत्तमरित्या देता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी ते नेहमीच संपर्कात राहून विविध सूचना करतात. जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पहिल्यापासून जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत त्यांनी माहिती देवून सुविधा पुरविण्याचा आग्रह धरला. सातारला जम्बो कोविड सेंटरसाठीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांवर पुणे, मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील मोठ्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्याची मागणी त्यांनी सर्वप्रथम केली. पाटण तालुक्‍याच्या दुर्गम भागातही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. 

कोरोनाबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातत्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशासकीय कामाचा पाठपुरावा केला. त्यांनी स्वतःच्या निधीतून 60 लाख रुपये कोविडसाठी वापरण्याचे पत्रही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहे. त्यांच्या कल्पनेतून येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये कोविड सेंटरही उभे राहत आहे. आमदार चव्हाण वाड्यावस्त्यांवर फिरून लोकांशी संवाद साधला आहे. स्पीकरवरून त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरात राहण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी कऱ्हाडसह जिल्ह्यात काय उपाययोजना करता येतील, या संबंधाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. कऱ्हाडला विद्युतदाहिनी बसविण्यासाठीही त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्याशिवाय तालुक्‍यातील नागरिकांना ऑक्‍सिजनच्या दोन रुग्णवाहिकाही त्यांनी उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद केली आहे. 

प्रशासनाप्रमाणे लोकप्रतिनिधीही नागरिकांच्या सोयीसाठी झटताना दिसत आहेत. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेत त्यांच्या पुष्कर मंगल कार्यालयात 80 बेडचे कोविड रुग्णालय उभारले आहे. यामध्ये 40 ऑक्‍सिजन बेड व 40 सर्वसाधारण बेड असणार आहेत. हे हॉस्पिटल येत्या एक ते दोन दिवसांत सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी हा दिलासा मिळणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातत्याने सामाजिक कार्यात दिसत असून ते जनतेच्या समस्या सोडवत आहेत. 

माण-खटाव तालुक्‍यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आमदार जयकुमार गोरे प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाढती रुग्णसंख्या पाहता मायणी मेडिकल कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये 50 बेड वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी 25 बेडचे काम वेगात सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुका पिंजून काढत जनतेच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला आहे. कोरोनाकाळात त्यांनी जनतेला विविध सुविधांचा लाभ करुन दिला आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यापासून विविध निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अत्यंत सचोटीने घेतले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला पाहिजे, मृत्यूदर घटला पाहिजे, यासाठी ते पहिल्यापासून झटत आहेत. केवळ कार्यालयात बसून आदेश न सोडता प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये जावून ते परिस्थिती हाताळत आहेत. कोरोनासंदर्भातील उपाययोजना करताना ते करत असलेल्या सूचना ऐकून अनेकदा वैद्यकीय अधिकारीही अवाक्‌ होतात. एवढा त्यांचा अभ्यास दिसतो. जिल्ह्यात जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याची धडपड सुरू आहे. रुग्णसंख्येचा विचार करूनच त्यांनी 400 बेडचा प्रस्ताव दिला. आत्ताही पुढील परिस्थितीचा विचार करून जादा बेड निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे आवाहनांचे व माहिती देणारे व्हिडिओही जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा व आधार देणारे ठरत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.