आघाडी सरकारच्या उद्दिष्टांमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
सातारा : महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांर्तगत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा एक भाग म्हणून जिल्हा पोलिस दलामार्फत (Satara Police Force) ऑनलाइन प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५०३ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ६३ हजार ७१२ विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टचचे (Good Touch and Bad Touch) प्रशिक्षण देण्यात आले.
आघाडी सरकारच्या उद्दिष्टांमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजेत, यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाच्या अंमलबाजवणीनंतर संपूर्ण राज्यभरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Ajay Kumar Bansal) यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत किशोरवयीन मुलींना (Girls) स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. अशी दोन शिबिरे आजवर जिल्हा पोलिस दलामार्फत राबविण्यात आली. या शिबिरांनंतर संबंधित युवतींना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.
किशोरवयीन मुलींबरोबर या प्रकल्पामध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, हाही एक महत्त्वाचा मुद्दा मानण्यात आलेला आहे. बालकांनाही लैंगिक अत्याचाराबाबत सजग करण्याची भूमिका या पथदर्शी प्रक्रल्पात मांडण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसदादा व पोलिसदीदी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पातळीवर पोलिस लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी अधीक्षक बन्सल यांनी पोलिसकाका व पोलिसदीदींची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून बालकांमध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाइन मार्गदर्शन सत्र घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी जिल्हा पोलिस मुख्यालयातील भरोसा सेलच्या माध्यमातून पीपीटी व व्हिडिओ तयार करून देण्यात आले आहेत. या पीपीटी व व्हिडिओंच्या सहायाने पोलिसकाका व पोलिसदीदींकडून मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जात आहे. दर आठवड्याला किमान चार शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट या काका व दीदींना देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ३० पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५०३ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हे प्रशिक्षण दिले गेले आहे. या शाळांमध्ये पोलिसकाका व दीदींची एकूण ५९९ ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्याचा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील २९ हजार ५८७ तर, माध्यमिक शाळांतील ३४ हजार १२५ अशा एकूण ६३ हजार ७१२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ मिळाला आहे. या शिबिरांमध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या कायद्याच्या माहितीबरोबरच प्रामुख्याने मुलांना गुड टच व बॅड टच याबाबत मार्गदर्शन देऊन सजग करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.