चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावणा-या 'एलसीबी' ला पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर

चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावणा-या 'एलसीबी' ला पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर
Updated on

सांगली : शेगाव (ता. जत) येथे सोने देण्यास जाणाऱ्या व्यापारी व त्याच्या साथीदाराच्या डोळ्यात चटणी फेकून त्यांना मारहाण करत अडीच कोटी रुपयांचे चार किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने पळवून नेणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली. एलसीबीसह तीन पथकांनी संयुक्त कारवाई केल्याने 24 तासांत पाच संशयित जेरबंद झाले. व्यापाऱ्याच्या व्यवसायातील भागीदाराचाही यात समावेश आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावीरल देशिंग फाटा येथे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
 
प्रवीण उत्तम चव्हाण (वय 27) व विजय बाळासाहेब नांगरे (वय 27, दोघेही य. पा. वाडी, ता. आटपाडी), विशाल बळू करांड (वय 27, गोरेगाव, ता. खटाव, सातारा), तात्यासाहेब शेट्टीबा गुसाळे (वय 36, मरडवाक, ता. खटाव, सातारा), वैभव साहेबराव माने (वय 32, भोसरे, ता. खटाव, सातारा) अशी त्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोटी 26 लाख 13 हजार 500 रुपयांचे सोने, चारचाकी, पिस्तूल सारखे दिसणारे लायटर, मोबाईल असा 2 कोटी 27 लाख 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जालन्यातील अपहरणकर्त्याची साताऱ्यात सुटका; काेल्हापूर, सांगली, साेलापूरच्या युवकांना अटक

अधिक माहिती अशी, की बाळासाहेब सावंत हे पळसखेड (ता. आटपाडी) येथील आहेत. बेळगाव येथील सराफ गल्लीत राहतात. सावंत व अन्य एक जण गुरुवारी सायंकाळी बेळगावहून (केए 22, एमबी 5422) या चारचाकी गाडीतून सोने पोचवण्यासाठी शेगावकडे निघाले होते. दरम्यान, जतपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळी वस्तीजवळ मध्यरात्री एकच्या सुमारास लघुशंकेसाठी दोघे गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी पाठलाग करत असलेले पाच दरोडेखोर पांढऱ्या चारचाकीतून घटनास्थळी आले. दरोडेखोरांनी सावंत व त्यांच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकली व त्यांना मारहाण करत गाडीतील साडेचार किलो सोने घेऊन पसार झाले. बाळासाहेब सावंत यांनी तत्काळ जत पोलिस ठाणे गाठत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

दरम्यान, पोलिस अधीक्षक गेडाम यांनी तत्काळ संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन पथके तयार करण्यात आली. पथकातील पोलिस गस्तीवर होते. फिर्यादी सावंत यांचा भागीदार प्रवीण चव्हाण यास चौकशीसाठी बोलवण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने चार साथीदारांसह सोने लुटल्याची कबुली दिली. चोरीचे सोने विक्रीसाठी चारही साथीदार देशिंग फाटा येणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार सापळा रचून चौघांना अटक करण्यात आली. संशयितांकडून प्रत्येकी 100 ग्रॅम सोन्याची 21 बिस्किटे (एक कोटी 25 लाख) व दोन किलो 430 ग्रॅम वजनाचे तेजाब (गाळलेले सोने) (एक कोटी 21 लाख) जप्त करण्यात आले. या कारवाईत अतिरिक्त अधीक्षक मनीषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, जतचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्यासह पथकाचा समावेश होता. 

दहशतीसाठी बनावट पिस्तूल पाच जणांनी ही चोरी नियोजनबद्धरीत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. संशयित प्रवीण चव्हाण हा फिर्यादीच्या व्यवसायात भागीदार असल्याने ते कधी सोने नेणार असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार कट रचण्यात आला. दहशत निर्माण करण्यासाठी बनावट पिस्तुलाचा वापर केला. वास्तविक तो एक लायटर होता, असे पोलिसांनी सांगितले. 

हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

पन्नास हजारांचे पारितोषिक 

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावला. यामुळे एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड व टीमला पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पन्नास हजारांचे पारितोषिक दिले. त्यांच्या कामगिरीचे कौतुकही केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.