पाटण तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यासाठी त्यांनी दोन वर्षे वयाची ‘हार्मोन ९९’ या जातीची १७० रोपे लागवडीस आणली.
ढेबेवाडी : आंबे (Mangoes), फणस, काजू, चिकू आदी फळांसह जांभळं, करवंद, तोरणे, डोंबले, आळू असा डोंगरचा रानमेवा बक्कळ पिकणाऱ्या वांग खोऱ्यात (Wang Valley) लवकरच सफरचंदाच्या बागाही बहरणार, अशी चिन्हे आहेत. काल मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने (Farmer Adhikrao Mane) यांच्या शिवारात सफरचंद लागवडीचा श्रीगणेशा झाला.
मानेगाव येथील अधिकराव माने यांनी आपल्या घराजवळ शेतात सफरचंदाची (Apple) बाग तयार केली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यासाठी माने त्यांनी दोन वर्षे वयाची ‘हार्मोन ९९’ या जातीची १७० रोपे लागवडीस आणून आठ बाय दहा फुटावरती लागवडीचे नियोजन केले. लागवड करण्यापूर्वी त्यांनी मे महिन्यामध्ये तीन बाय तीन आकाराचे खड्डे काढून त्यात ३५ ट्रेलर बंधाऱ्यातील गाळ भरला, प्रत्येक खड्ड्यामध्ये दोन पाटी शेणखत टाकले.
लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये सुफला व बुरशीनाशक पावडरचा वापर केला. काटेवाडी (ता. माण) येथील जालिंदर दडस यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. काल व आज तेथे सफरचंद रोपांची लागवड करण्यात आली. काल झालेल्या कार्यक्रमास सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार आदींसह शेतकरी, कृषी अधिकारी, पदाधिकारी तसेच दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, कृषी पर्यवेक्षक महादेव आगवणे, कृषी सहायक विद्या जंगम, अर्जुन पवार, गणेश सावंत आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले. श्री. माने यांनी शेतीमध्ये केलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. माने कुटुंबीयांनी स्वागत केले.
सफरचंद हे विशेषतः काश्मीर व हिमाचल या थंड प्रदेशातील फळ असून, आपल्या परिसरात त्याची लागवड करून त्याचे उत्पादन घेण्याचा हा एक धाडसी व वेगळा प्रयोग आहे. लागवडीपर्यंत सुमारे ६५ हजार रुपये खर्च आला आहे. तीन वर्षांनी फळे बाजारात येण्यास सुरुवात होईल.
-अधिकराव माने, सफरचंद बागमालक शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.