सातारच्या वडापावची चवच न्यारी

सातारच्या वडापावची चवच न्यारी
Updated on

सातारा : लुसलुशीत पाव, शेंगदाण्याची तिखट चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे अस्सल सातारकरांचा विक पॉइंट, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. देशभरात आजचा २३ ऑगस्टचा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येक यशस्वी लोकांनी सुरवातीला पोटाची खळगी भरण्यासाठी वडापाव खाऊन दिवस काढलेत. अनेकांचं नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. तसेच जगभरात इंडियन बर्गर म्हणूनही वडापावला ओळखलं जातं.

आज जागतिक वडापाव दिवसानिमित्त सोशल मीडियावर वडापावसंदर्भात ब-याच पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर साता-यातही वडापावला अनन्यसाधारण महत्व प्राप्त असून त्याबाबतची आम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यास वडापाव विक्रत्यांकडून प्रतिसाद मिळाला. सध्या लाॅकडाउनमुळे वडापाव व्यवसाय बंद असले, तरी ग्राहकांच्या आग्रहास्तव घरपोच वडापावची सुविधा देण्यात येत आहे. तसेच त्यांनी वडापावची दुकानं सुरु नसल्याने खंतही व्यक्त केली. आज जवळ-जवळ साता-यात छोटी-मोठी अशी ५० ते ७० दुकानं असल्याचेही त्यांनी सांगितले. सातारा शहर तसं जिल्ह्याचं मुख्य ठिकाण! या शहरात मुख्य बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ पहायला मिळते. ग्रामीण भागातील बरेच लोक या शहरात बाजारहटासाठी येत असतात. काही लोक घरुन डब्बा आणतात, तर काही येथील वडापावावर ताव मरत आपली भूक भागवत असतात. 

साता-यातील सुपनेकर वडापाव, पाटील वडापाव, सम्राट वडापाव, रविवार पेठेतील अन्नपूर्णा वडापाव सेंटर, कुलकर्णी वडापाव, शिवनेरी वडापाव इत्यादी वडापावची दुकानं सर्वांनाच भूरळ घालत असतात. शहरात ठिकठिकाणी टप-यांवरही वडापावची क्रेझ पहायला मिळते. साधारण १९७० ते १९८० या कालावधीत सातारा शहरात वडापावचा उदय झाला, असे काही जाणकार सांगतात. तद्नंतर या वडापावने येथील नागरिकांना भूरळ घालायला सुरुवात केली आणि बघता-बघता हा वडापाव सातारकरांच्या पसंतीस उतरला. आज मोठ्या प्रमाणात सातारा शहरात वडापावची दुकानं पहायला मिळतात. सध्या सातारा शहरात वडापाव ५ ते २० रुपया पर्यंत मिळतो. त्यामुळे अनेकजण सर्वाधिक पसंती वडापावलाच देत असतात. लाॅकडाउनमुळे वडापावची दुकानं बंद असल्याने नागरिक स्वतः घरीच वडापाव बनवून खात आहेत. याबाबत काही नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनीही वडापाव मिळत नसल्याने खंत व्यक्त केली.

गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणताच भेद न करता गल्लीच्या कोपऱ्यापासून ते पार फॅन्सी हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला वडापाव सहज पाहायला मिळतो. लुसलुशीत पावात तिखट गोड चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे एखाद्या खवय्यासाठी पर्वणीच, या अस्सल देशी फास्ट फूडचा सेलिब्रेशन करण्यासाठी आज 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. १९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला, असं मानलं जातं.

याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतल्या विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे, तर लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे, त्यामुळे परदेशातही वडापावचा बोलबाला पहायला मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.