ढेबेवाडी (सातारा) : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शहर गाठण्याची आणि क्लासेस (Classes) लावून तयारी करण्याची गरज नाही. कष्टाची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Maharashtra Public Service Commission Examination) यश मिळवून नुकतीच सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या तेजस्विनी भरत चोरगे (Tejaswini Chorge) यांनी दिला. (Tejaswini Chorge Has Said That Classes Are Not Necessary For Success In Competitive Examination)
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शहर गाठण्याची आणि क्लासेस लावून तयारी करण्याची गरज नसल्याचे मत तेजस्विनी चोरगे यांनी व्यक्त केले.
गलमेवाडी (ता. पाटण) येथील तेजस्विनी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कोणत्याही क्लासेसचा आधार न घेता एमपीएससीत उज्ज्वल यश संपादन केले. नुकतीच त्यांची पिंपरी-चिंचवडच्या सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी (Assistant Motor Vehicle Inspector) नियुक्ती झाली. त्यांचे वडील भरत चोरगे यांचा तळमावलेत टेलरिंगचा व्यवसाय असून हे कुटुंब अनेक वर्षांपासून तळमावल्यात वास्तव्यास आहे. तेजस्विनी म्हणाल्या, ‘‘स्पर्धा परीक्षेत उतरून तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ना, मग मोठा खर्च, शहरातील क्लासेस, किचकट अभ्यास हा सगळा बागुलबुवा तुमच्या डोक्यातून प्रथम काढून टाका.
तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या क्षेत्राविषयीची समग्र माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. हे झटपट मिळणारे यश नाही. त्यासाठी दररोज पुरेसा वेळ देवून आणि कष्ट घेऊन नियमित अभ्यास करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला चांगला मार्गदर्शक मिळणेही खूप महत्त्वाचे असते. मी चार वर्षे तयारी केली. इतरही अनेक परीक्षा दिल्या. क्लास न लावता स्वतः आवश्यक माहिती संकलित केली. लायब्ररीचा पुरेपूर वापर केला. यु ट्यूब तसेच नेटवरून माहिती मिळविली. आई सुनीता, वडील भरत चोरगे, आजोबा केशव माटेकर यांच्यासह सर्व कुटुंबीय, नातेवाईक पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने प्रोत्साहन मिळत गेले. अजून कष्ट घेऊन श्रेणी एकचे पद गाठायचे माझे स्वप्न आहे.’’
ध्येय गाठताना लगेच यश मिळेलच असेही नाही. त्यासाठी पुन्हा-पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्याकडे असायलाच हवी. अपयशाने खचलात तर संपलात, न डगमगता नव्या उत्साहाने पुढे चालत राहा.
-तेजस्विनी चोरगे, सहायक मोटार वाहन निरीक्षक
Tejaswini Chorge Has Said That Classes Are Not Necessary For Success In Competitive Examination
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.