दहा घरांना भीषण आग लागून घरांचे पन्नास लाखांच्या वर नुकसान झाले आहे.
चाफळ (सातारा) : पती-पत्नीच्या घरगुती भांडणाच्या रागातून पतीनं स्वत:चं घर पेटवल्यानं शेजारील नऊ कुटुंबाच्या घरास भीषण आग लागल्याची घटना काल (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता घडली. आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते, की त्यामध्ये सर्व दहा कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दाग-दागिने, रोखड, शेतीची औजारे आदी आगीत जळून खाक झाले. मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नाही.
येथील संजय रामचंद्र पाटील व पालवी संजय पाटील यांचे कौटुंबिक घरगुती भांडण काल दिवसभर सुरू होते. या भांडणाच्या रागाने वतागून संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घरात आग लावली. त्यामध्ये घरातील गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले, त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील, दातत्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या दहा घरांना भीषण आग लागून बाधित सर्वांचे घरासह पन्नास लाखांच्या वर नुकसान झाले आहे.
सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्नि शामक या तीन गाड्यांना प्रचारण करताच काही अंतरच्या फरकाने या सर्व गाड्या घटना स्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या दोन तासांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत सर्व घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, दागिने, रोखड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. माजगाव ग्रामपंचायतीने नळास मुबलक पाणी सोडून गावातील तरुणांनी प्रथम आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. शेजारील लोकांनीही घरातील मिळेल, त्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी माहिती मिळताच, मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे (Malharpeth Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, चाफळ पोलीस (Chafal Police) दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनी घटनास्थळी येऊन सर्वतोपरी सहकार्य केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.