10 Rupee Coin : दहाच्या नोटांनंतर नाण्यांचाही कृत्रिम तुटवडा

महाबळेश्र्वरला व्यापारी त्रस्त : सुट्या पैशांअभावी पर्यटकांचीही होतेय गैरसोय
10 Rupee Coin
10 Rupee Coin Sakal
Updated on

महाबळेश्वर : येथे ऐन उन्हाळी हंगामात दहा रुपयांच्या चलनाच्या तुटवड्यामुळे व्यापारी व पर्यटक त्रस्त झाले आहेत. पूर्वीपासून येथे चलनातून दहा रुपयांच्या नोटा गायब होत्या; परंतु आता तर दहा रुपयांची नाणी देखील मिळत नसल्यामुळे व्यापारी, पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे; परंतु हा कृत्रिम तुटवडा नेमका झालाय का?

याबाबत माहिती मिळत नसल्याने शंकेचे निरसन करायचे कोणी? याबाबत सर्वांचेच मौन दिसून येत आहे. येथे पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. उन्हाळी हंगामात हा येथील सर्वात महत्त्वाचा हंगाम समजला जातो, कारण या हंगामावर येथील स्थानिकांचे पुढील चार महिन्यांचा उदरनिर्वाह,

बॅंकेचे हप्ते, शाळेच्या फी व पुढील वर्षाचे आर्थिक उलाढालीचे नियोजन ठरत असते. मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका कमी; परंतु व्यापारी, मध्यमवर्गीय व रोजच्या कमाईवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना जास्त बसत असल्याने सध्या ते त्रस्त आहेत.

येथील बाजारपेठेसह तालुक्यात सर्वच ठिकाणी पर्यटकाला फिरत असताना नेहमीच किरकोळ सुट्या पैशांची आवश्यकता भासत असते. अनेकवेळा फिरत असताना पाण्याची बाटली, वेफर पॅकेटसारख्या किरकोळ वस्तू घेताना सुटे पैसे लागतातच.

बऱ्याचदा या किरकोळ खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंटचे माध्यम वापरले जाते; परंतु प्रवास करताना किंवा फिरत असताना अचानक मोबाईलचे नेटवर्क गेल्यास गैरसोय होऊन नाहक त्रास सहन करावा लागतो. येथे बाजारपेठेतील व्यापारी दुकानात शक्यतो सुटे पैसे ठेवतात; परंतु सध्या बॅंकेतून दहा रुपयांच्या चलनाची ऐन उन्हाळी हंगामातच सर्वत्र कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती आहे.

अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना दहा रुपयांच्या चलणासाठी बाहेरगावी एक हजार रुपयांना १० रुपये कमिशनचा भुर्दंड सोसावा लागतो; परंतु सध्या ते देखील मिळत नसल्याने येथे व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.

याबाबत शासनानेही गंभीर पावले उचलून हा कृत्रिम तुटवड्याचा शोध घेऊन वारंवार होणाऱ्या तुटवड्यापासून ग्राहकांना विनाकारण होत असलेल्या त्रासाची समस्या सोडवून यासाठी कायमस्वरूपी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.

ऑनलाइन माध्यमाला प्रोत्साहन देण्यासाठी काही प्रमाणात इंटरनेट सुविधा व विजेची समस्या तरी सुरळीत व मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याकडे देखील शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सोयी असूनही या वापरण्यास अडथळे निर्माण झाल्याचे दिसत आहे.

निवडणुकीमुळे सुटे पैसे पुरविण्यासाठी शासनाकडे पुरेशी सुरक्षेची व्यवस्था नसल्याचे जुजबी कारण प्रशासनाकडून सांगितले जाते. बॅंकेतील कर्मचाऱ्यांना सुट्या पैशांअभावी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन?

सध्या आचारसंहिता व निवडणुकीमुळे आधीच येथे पर्यटकांची गर्दी कमी आहे. त्यामुळे व्यवसाय कमी झाल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यात कृत्रिम टंचाईमुळे बॅंकेच्या हेलपाटे मारण्यात व्यापाऱ्यांचा वेळ जातो. यूपीआयसारखे विविध कंपन्यांच्या ऑनलाइन पेमेंटला शासनाकडून प्रोत्साहन देत नसेल ना? अशी शंका व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.