सातारा : कोरोना संसर्ग व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेची निवडणूक लागण्याबाबत अद्याप निश्चितता नसताना संभाव्य वॉर्डचा आराखडा गेल्या तीन दिवसांत साताऱ्यातील समाजमाध्यमांवरील ग्रुपवर वेगाने फिरत आहे. त्यामुळे गल्ली-बोळांत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांच्या आपल्या वाट्याला येणाऱ्या भागात फेऱ्या सुरू झाल्याने साताऱ्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. (Satara municipality News Updates)
सातारा पालिकेच्या कार्यकारिणीची मुदत २५ डिसेंबरला संपली आहे. त्यामुळे निवडणुकांचे वेध राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य मतदारालाही लागले आहेत. सुरवातीला कोरोना संसर्गामुळे निवडणूक पुढे जाईल, अशा शक्यता वर्तविण्यात येत होत्या. परंतु, प्रशासकीय पातळीवर निवडणूकपूर्व तयारी ही सुरूच होती. त्यानुसार वाढीव भाग आणि आयोगाच्या सूचनांनुसार दोन सदस्य प्रभाग पद्धतीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची तयारी दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली. ती निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून तो आराखडा आल्यावर तो प्रकाशित केला जातो. त्यावर होणाऱ्या हरकतीव सूचनांचा विचार करून प्रभागांचा अंतिम आराखडा जाहीर होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा गोळा करण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. या कारणामुळेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत ओबीसी जागा या खुल्या म्हणून गणल्या गेल्या. जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी मांडली आहे. त्यामुळे पालिका, महापालिकांच्या मुदत संपूनही अद्याप निवडणुका जाहीर होण्यास विलंब लागला आहे. निवडणूक आयोग किती काळ थांबते, यावर या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मुदत संपूनही सातारा पालिका क्षेत्रात निवडणूक फिव्हर चढलाच नव्हता. राजकीय पातळीवर शांतताच होती. परंतु, ही शांतता गेल्या काही दिवसांत भंग झाली आहे. साताऱ्यात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे.
दरम्यान, या वेळची सातारा पालिकेची निवडणूक हद्दवाढ झालेल्या भागासह होणार आहे. हद्दवाढीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे त्याला वेगळे असे महत्त्व आहे. साताऱ्यातील दोन महत्त्वाच्या आघाड्यांना आपली शहरातीलताकद आजमावण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रभावाचा वापर प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करताना लावल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अनेकांचे या प्रारूप आराखड्याकडे लक्ष लागले होते. हा संभाव्य बहुचर्चित प्रारूप आराखडा अधिकृतरीत्या अद्याप जाहीर केलेला नाही. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांपासून साताऱ्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा समाजमाध्यमांवर वेगाने फिरू लागला आहे. या आरखड्यात प्रभाग क्रमांक, प्रभागात समाविष्ट होणारा परिसर, प्रभागाच्या चतु:सीमा याचा सविस्तर समावेश आहे.
मातब्बरांचे हक्काचे मतांचे पॉकेट फुटले?
व्हायरल वॉर्ड रचनेत काही मातब्बर नगरसेवकांचे हक्काचे मतांचे पॉकेट फुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. समोर कोण येणार, याचा अंदाज बांधून त्यांनीही आपल्या संभाव्य वॉर्डमध्ये हातपाय हलवायला सुरवात केली आहे. नेत्यांनीही कामाला लागण्याचे गुप्त मेसेज सुरू केले आहेत. अधिकृत आरखड्यात काय होईल ते होईल. परंतु, या व्हायरल आराखड्यामुळे थंडीने गारठलेल्या साताऱ्यातील राजकीय हवा मात्र चांगलीच तापली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.