पुणे- बंगळूर महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी प्रशासनाने कोल्हापूर नाक्यावरून शॉर्टकट दिला आहे.
कऱ्हाड : कोल्हापूरकडून शहरात येण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरून (Pune-Bangalore Highway) कोल्हापूर नाक्याचा (Kolhapur Naka) मार्ग होता. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली होती. त्याचा विचार करून महामार्ग विभागाकडून सध्या तेथील उड्डाणपूल पाडून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे- बंगळूर महामार्गावरून शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरून शॉर्टकट मार्ग देण्यात आला आहे. त्यातून फक्त सायकल, चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकींनाच परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, त्या मार्गावरून चक्क ट्रक, टेंपोही आणले जात आहेत. त्यामुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला असून, त्यावर कोणाचेही नियंत्रणच नसल्याचे चित्र आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरून शहरात येण्यासाठी पूर्वी मार्ग होता. मात्र, त्या मार्गावर शेकडो अपघात होऊन अनेकांना जिवास मुकावे लागले. तेथे उड्डाणपूल (Flyover) व्हावा, यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. त्याचा विचार करून सध्या त्या मार्गावर दोन्ही बाजूला उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
हे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी पाटण तिकाटण्याकडून येण्याचा रस्ता ठेवण्यात आला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती, महिला व कामगार यांची मोठी गैरसोय होत होती. त्याचा नागरिकांना मानसिक आणि आर्थिक फटका बसत होता. त्याचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगण यांनी कोल्हापूर नाक्यावरून शॉर्टकट देण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्याची दखल प्रशासनाने घेतली. त्यावर पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तत्कालीन शहर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे सहायक तत्कालीन पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी तेथील पाहणी चाचणी घेतली. त्यानंतर कोल्हापूर नाक्यावरून हलक्या वाहनांना शॉर्टकट खुला करण्यात आला आहे. त्या मार्गावरून सायकल, चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकींनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्या शॉर्टकटमधून अवजड वाहनेही आणली जात आहेत.
ट्रक, टेंपो या मार्गावरून शहरात येत असल्याने अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. त्याकडे नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याअगोदर महामार्ग विभाग आणि पोलिसांनी त्यावर निर्बंध आणावे, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांतून होत आहे.
कऱ्हाड शहरात येणाऱ्या शॉर्टकटच्या रस्त्यावर मोठा पाऊस झाला, की गुडघाभर पाणी साचत आहे. सध्या अधूनमधून वादळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यातूनच वाहनधारकांना वाहने न्यावी लागत आहेत. त्यातच त्या रस्त्यावर खड्डेही पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या रस्त्यावर खड्डे पडूनही ठेकेदारांचे त्याकडे दुर्लक्षच झाले आहे.
पुणे- बंगळूर महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी प्रशासनाने कोल्हापूर नाक्यावरून शॉर्टकट दिला आहे. त्यातून ट्रॅव्हल्स, टेंपो, ट्रक, ट्रॅक्टर आणले जात आहेत. त्यामुळे छोट्या वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महामार्ग विभाग आणि पोलिसांनी त्या मार्गावरून मोठ्या, अवजड वाहनांचा प्रवेश तातडीने बंद करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
-दादा शिंगण, मनसे तालुकाध्यक्ष, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.