सातारा - पर्यटन विकासाला जिल्ह्यात असलेला वाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन मागील वर्षभरात तब्बल पाचशे कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच धार्मिक पर्यटन किल्ल्यांचा विकास व जतन, पश्चिमेकडील तालुक्यातील स्थानिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. यातून कोयना, पाटण, कास पठार, ठोसेघर, बामणोली, महाबळेश्वर येथे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यातून आगामी दोन वर्षांत १५०० ते २००० कोटींची अर्थव्यवस्था जिल्ह्यात निर्माण होणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आकार घेत आहे. यामुळे आगामी काळात या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवाढीला मोठी संधी आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा तालुक्यांतील पर्यटनस्थळांचेही महत्त्व वाढणार आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत पर्यटन विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला गेल्या वर्षभरात पर्यटन विकासाला तब्बल पाचशे कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच यातून विविध विकासकामे या चार तालुक्यांत होणार आहेत.
वृक्षतोड न करता रस्ते, बांधकामे
1) या माध्यमातून आगामी दोन वर्षांत १५०० ते २००० कोटींची अर्थव्यवस्था जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे.
2) पर्यटन विकास होताना पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य देण्यासोबतच वृक्षतोड न करता रस्ते, बांधकामे केली जाणार आहेत.
3) मुनावळेत बोट क्लबचे काम सुरू असून, तेथे एक वृक्षही न तोडता कामे केली जात आहेत.
प्रतापगड किल्ल्याचे जतन, संवर्धन
पर्यटनाला चालना देताना प्रतापगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचाही समावेश आहे. त्यासाठी १२८.१५ कोटींचा आराखडा असून, त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. या किल्ल्याचे वैभव जतन करण्यावर विशेष भर असेल. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.
महिनाभरात मुनावळेचे वॉटर स्पोर्टस् सुरू
सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रात पर्यटन विकास आराखड्यात प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीसाठी वाहने खरेदी, तसेच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करणे याचा यामध्ये समावेश आहे. यासाठी ४४.९९ कोटी, तर कोयना जलपर्यटनासाठी २२.०६ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार येत्या महिनाभरात मुनावळेचे वॉटर स्पोर्टस् सुरू होणार आहे.
क्षेत्र महाबळेश्वर विकास
क्षेत्र महाबळेश्वर येथे अनेक भाविक भेट देत असतात. तेथे पाच नद्यांचा उगम आहे, तसेच प्राचीन शिवमंदिरे आहेत. या परिसराचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. त्यासाठी १८७.४२ कोटी रुपयांचा आराखडा असेल. त्यातून येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आदींचा समावेश आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
मुनावळे जलपर्यटन प्रकल्प साकारत आहे. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि पर्यटन विकास महामंडळ यांच्यात करार झाला आहे. कोयना शिवसागर जलाशयाच्या परिसरात पर्यटनवाढीला चालना देणार हा प्रकल्प आहे. जागतिक दर्जाचा नावीन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित होत आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यामध्ये पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा प्रकाराचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हिजनमधून हा प्रकल्प होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.