सातारा : तालुक्यातील कुशी गावालगत असलेल्या डोंगरमाथ्यावरील सुळकफणी हे निसर्गस्थळ पर्यटकांना भुरळ घालत आहे. गेले वर्षभर लोकसहभागातून या स्थळाचा कायापालट सुरू आहे. त्यातून या परिसराला नवे रूप लाभले आहे. त्यातून भाविक तसेच पर्यटकांची पावले या ठिकाणाकडे वळत आहेत.
सातारा जिल्ह्याला प्राचीन, आध्यात्मिक, ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कित्येक प्राचीन मंदिरे जिल्ह्याच्या विविध भागात आहेत. ऐतिहासिक गडकिल्ल्यांनी इथली भूमी संपन्न बनली आहे. मोठ्या संख्येने निसर्गस्थळेही जिल्ह्यात आहेत. उंच धबधब्यांनी जिल्ह्याचा लौकिक सर्वदूर पोचविला आहे. याच पंक्तीत अलीकडच्या काळात सातारा तालुक्यातील कुशी गावाच्या पश्चिमेस डोंगरमाथ्यावर असलेल्या सुळकफणीचा समावेश होत आहे. साताऱ्यातून आनेवाडी टोलनाक्याच्या थोडे अलीकडे कुशी गावाकडे जाणारा रस्ता आहे. गावातील शाकंभरी मातेचे शक्तीपीठही विशेष प्रसिद्ध आहे. गावातील मुख्य रस्त्याने सरळ असलेली पाऊलवाट डोंगराकडे जाते. वाटेत पहिली गवळण, दुसरी गवळण, पाझर तलाव, ससे पठार ही स्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
सुळकफणीचा सुळका झाडीत लपलेला आहे. डौलाने फडकणारा भगवा ध्वज त्याची साक्ष देतो. सुमारे तासाभराच्या चढणीनंतर मुख्य ठिकाणी पोचता येते. समुद्रसपाटीपासून 1092 मीटर उंचावर हे ठिकाण आहे. तिन्ही बाजूला डोंगर अन् मध्येच फणीच्या आकाराचा सुळका अशी इथली भौगोलिक रचना आहे. तेथील उंच सुळक्यावर सिद्धनाथांचे आकर्षक, छोटेखानी मंदिर आहे. लगतच छोटे कृत्रिम तळे आहे. बाजूचे विविध आकाराचे महाकाय दगड थक्क करतात. येथील शिखरावरून मेरुलिंग, कण्हेर धरण, पाटेश्वर, यवतेश्वर, जरंडेश्वर या स्थळांचे दर्शन घडते. अजिंक्यतारा, कल्याणगड, चंदनगड, वंदनगड, वैराटगड हे किल्लेही दृष्टिक्षेपात येतात. अलीकडच्या काळात येथील मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांची पावलेही या परिसराकडे वळताना दिसत आहेत.
लोकसहभागातून झाला कायापालट
या स्थळाचा युवक, ग्रामस्थ, देणगीदार अन् लोकसहभागातून कायापालट झाला आहे. या परिसराला नवे रूप लाभले आहे. माथ्यावर जाणाऱ्या वाटांची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यटकांना विसाव्यासाठी बाके बसविण्यात आली आहेत. मंदिराकडे जाणारे दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. दोन कृत्रिम तळ्यांची निर्मितीही करण्यात आली आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.