दहिवडी (जि. सातारा) : माण (mann) तालुका अंशतः अनलॉक (unlock) झाला असला तरी पंधरापेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित (covid19 patients) असलेली २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित करण्यात आली असून, ती अजूनही लॉकच आहेत. (trending-news-27-villages-decleared-containment-zone-satara)
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण माण तालुक्यात अंशतः निर्बंध हटवले गेले आहेत, असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे सोमवारी बहुतांशी गावात वर्दळ वाढलेली दिसून आली. खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले. मात्र, २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. हे समजल्यानंतर संबंधित गावे बंद करण्यासाठी संबंधित गावांतील प्रशासन सरसावले. २७ पैकी २१ गावे ही एक जून रोजीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती. दहिवडी, म्हसवड, बिदाल, मार्डी, वावरहिरे, पळशी, आंधळी, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, मलवडी, गट्टेवाडी, वर मलवडी, भालवडी, शिंदी खुर्द, शिंगणापूर, बोडके, जाशी, परकंदी, राणंद, वडगाव व अनभुलेवाडी ही ती गावे आहेत. सात जून रोजी शेनवडी, महाबळेश्वरवाडी, वाघमोडेवाडी, गोंदवले खुर्द, कारखेल व राजवडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली.
सात जून रोजी दहिवडी, म्हसवड, मलवडी, गोंदवले बुद्रुक या बाजारपेठांच्या गावांतील दुकाने उघडण्यात आली होती. लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. परंतु, प्रशासनाने आवाहन करून अत्यावश्यक सेवा वगळून पुन्हा सर्व व्यवहार बंद केले. दुकाने उघडली व लगेच बंद केल्यामुळे सामान्य जनतेत संभ्रमाचे वातावरण होते. काही गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ध्वनिक्षेपकावरून ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांना प्रशासनाचे आदेश वाचून दाखवले. त्यामुळे काही वेळातच बाजारपेठा बंद झाल्या. २७ गावांपैकी ज्या गावांतील सक्रिय रुग्णसंख्या पंधरापेक्षा कमी झाली अशा गावांमधील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात येत आहे. तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रशासन यांनी संसर्गाचा धोका कमी असून, प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात हरकत नाही, असा अहवाल दिल्यानंतरसुध्दा त्या-त्या गावांतील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात येणार आहे.
दरम्यान, आजच्या अहवालानुसार माणमध्ये ७४४ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी दहिवडी ८०, राजवडी ७६, बिदाल ३५, गोंदवले बुद्रुक ३५, म्हसवड ३१, वाघमोडेवाडी ३१, वरकुटे मलवडी ३०, भालवडी २९, जाशी २९, परकंदी २५, कारखेल २२, आंधळी २१, बोडके १८ असे कोरोनाबाधित आहेत.
मोठ्या कष्टाने कोविड-१९ आजारावर नियंत्रण मिळवत आहोत. छोटीशी चूकही आपल्याला मोठ्या संकटात नेऊ शकते. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी जनतेने आजपर्यंत प्रशासनाला जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य अजून काही दिवस केले तर आपण परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यात यश मिळवू असा विश्वास प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.