महाबळेश्वर (जि. सातारा) : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद यांच्यावर गुन्हा दाखल केला. पालिकेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणारे मिळकतधारकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यालगत वेण्णालेक ते लिंगमळा या दरम्यान वेण्णा नदी वाहते. नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्याने या ठिकाणी नदीपात्र लहान आहे. ही नदी पुढे जाते तसे नदीपात्र रुंद होत जाते. वेण्णालेक ते लिंगमळा या दरम्यान नदीपात्रात अनेक मिळकतधारकांनी अतिक्रमण करून तेथे विनापरवाना बांधकामे केली आहेत.
या ठिकाणी अनेकांनी लॉज, हॉटेल, ढाबे व रेस्टॉरंट सुरू केले आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम केल्याने येथील पर्यावरणाची हानी झाली आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नदीपात्रातील बांधकामांकडे कायम दुर्लक्ष केल्याने येथील विनापरवाना बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालिकेत नव्याने आलेल्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नदीपात्राची पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाटबंधारे विभागाकडे रक्कम भरली आहे.
विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा पाठवून विनापरवाना बांधकामे काढून घेण्यास कळविले आहे. पालिकेने शांताराम गणपत बावळेकर व अस्लम कासम नालबंद यांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या; परंतु या दोघांनीही पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी पाटील यांनी बावळेकर व नालबंद यांच्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने वेण्णा नदी पात्रात विनापरवाना बांधकाम करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी बावळेकर व नालबंद यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतरचा महाराष्ट्राला बसलेला दूसरा धक्काच म्हणावा लागेल
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.