खंबाटकी घाटमार्गे वाहतुकीची कोंडी पाहून अनेकांनी कॅनॉलवरून बोगद्यामार्गे उलट दिशेने वाहतूक वळविली.
खंडाळा : महामार्गावरील (Satara-Pune Highway) सातारा बाजूकडे जाणारा खंबाटकी घाट व बोगद्यामार्गे पुण्याकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर काल प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. १४ तासांपेक्षा अधिक काळ दोन्ही बाजूचे घाट रस्ते जाम झाल्याने वाहनचालकासह लहान मुले, अबालवृद्ध प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, रात्री उशिरा बोगद्यामार्गे पुण्याला जाणाऱ्या एस कॉर्नरवर कंटेनरने दोघांना चिरडले. अपघातातील दोघांची ओळख पटली नव्हती. याबाबत माहिती अशी, की सलग सुट्यांमुळे तसेच गणेशोत्सवानिमित्त विशेषतः कोकणवासीय गावाकडे निघाले असल्याने महामार्गावर काल सकाळपासून वाहनांची मोठी संख्या होती. परिणामी, घाट मार्गात वाहनांची गती कमी करावी लागली होती.
यातच ट्रक व जड वाहने रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडी होत गेली. यामध्येच एक ट्रक घाटाच्या चौथ्या वळणावर बंद पडल्याने वाहतूक कोंडी वाढतच गेली. पोलिसांनी मोठी जड वाहने, कंटेनर ट्रेलर घाटाच्या पायथ्याला थांबविली. मात्र, तरीही बस व ट्रक घाट मार्गात असल्याने वाहतूक नियंत्रणात आली नाही. उलट वाहतुकीचा कोंडमारा वाढतच गेला.
दरम्यान, याचवेळी खंबाटकी घाटमार्गे वाहतुकीची कोंडी पाहून अनेकांनी कॅनॉलवरून बोगद्यामार्गे उलट दिशेने वाहतूक वळविली. यामुळे सकाळी १० वाजता पुणे बाजूकडे जाणारी वाहतूकही खोळंबली. दोन्ही बाजूने हा घाट जाम होत गेला. खंबाटकी घाटातून सातारा बाजूकडे जाणाऱ्या गाड्या हे अधिक काळ चालूच राहिल्याने गाड्या गरम झाल्या. यामुळे घाटात या गाड्या थांबवाव्या लागल्या.
त्यामुळे गाड्या लावण्यासाठी जागाही अपुरी पडत होती. काही गाड्या घाटातच बंद पडत होत्या. यावेळी प्रवासी या बंद गाड्या ढकलत बाजूला करत होते. दरम्यान, एक ट्रक घाटात बंद पडला होता. तो मात्र दिवसभर आहे तसाच उभा होता. वाहतूक कोंडीमुळे लहान मुले व अबालवृद्ध यांचे प्रचंड हाल झाले. बंद पडलेली गाडी बघून भर उन्हात एक महिला आपल्या छोट्या मुलाला पदराखाली घेऊन चालत घाटमार्ग पार करीत होती. वयोवृद्ध महिला व पुरुषही घाटरस्त्याच्या कठड्यावर बसून राहिले होते.
तर गाड्या गरम होऊन गाडीतून धूर निघत असल्याने अनेक गाड्या तासन्तास घाटात उभ्या होत्या. वयोवृद्ध प्रवासी गाडीतच उन्हाचे चटके सोसत ताटकळत बसले होते. अर्धा तासाच्या प्रवासासाठी तब्बल दीड ते दोन तास मोजावे लागत होते. यामुळे प्रवाशांना आज प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, तर पोलिसांची तारांबळ उडाली.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, सहायक पोलिस निरीक्षक (वाहतूक) हर्षद गालिंदे, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ लिमण व प्रकाश घनवट, राजू अहिरराव, वाहतूक पोलिस संकपाळ, मनोज गायकवाड, विकास कदम, अविनाश डेरे, फरांदे, निंबाळकर, विजय बागल, जाधव, तात्या फरांदे व इतर पोलिसांनी यांनी दिवसभर वाहतूक नियंत्रणासाठी मोठी कसरत केली. मात्र, तरीही रात्री उशिरापर्यंत घाट रस्ता जामच राहिला. बोगद्यामार्गे वेळे (ता. वाई) पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, तर खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांची संख्या अधिक होती.
सातारा : खंबाटकी घाट आज सकाळी सात वाजल्यापासुनच जाम झाला होता. महामार्ग वहातुक पोलीस व खंडाळा पोलीस घाटामध्ये दिवसभर उपाशीपोटी भर उन्हात उभे राहून खोळंबलेली वाहतूक सुरळीत करीत होते. घटनेचे वार्तांकन करण्यासाठी दैनिक ‘सकाळ’चे खंडाळा बातमीदार अश्फाक पटेल हेही घाटात दाखल झाले होते. पोलिस उपाशीअसल्याचे लक्षात येताच श्री. पटेल कसातरी मार्ग काढत पुन्हा खंडाळ्यात उतरले. पाण्याच्या बाटल्या, सफरचंद व केळी तसेच भरपेट नास्टा घेऊन घाटातील ट्राफीक तोडत ते पुन्हा पोलिसांपर्यंत पोहचले आणि या पोलिसांना खाऊ घातले.
बोगद्यामार्गे पुण्याला जाणारा रस्त्यावरील अपघातग्रस्त एस कॉर्नरवर एसटी बसला कर्नाटक बसने पाठीमागून धडक दिली, तर यावेळी ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने ट्रक व मोटार या दोन गाड्या घासल्या गेल्या. यामध्ये चारही गाड्यांचे नुकसान झाले. एकजण किरकोळ जखमी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.