जिल्हा शल्यचिकित्सकांनी केसपेपरही संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा : जिल्हा रुग्णालयातील (Satara Hospital) केसपेपर (Casepaper) विभागाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता कॉम्प्युटरायज्ड केसपेपर मिळणार असून, त्याद्वारे मिळालेला केसपेपर (‘युनिकोड’) क्रमांक हा आयुष्यभरासाठी एकच राहणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या नागरिकांच्या भेटीचे रेकॉर्ड मेन्टेन होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व सल्ला घेण्यासाठी बहुतांश रुग्ण हे लांबून जिल्ह्याच्या विविध भागांतून येतात. त्यामुळे रुग्णालयात आल्यावर त्यांना तातडीने केसपेपर उपलब्ध होणे आवश्यक असते. तरच ते वेळेत डॉक्टरांना (Doctor) दाखवणे, त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करणे व पुन्हा त्यांना दाखवून औषधे व सल्ला घेणे या पुढील बाबी करू शकतात. अन्यथा त्यांना सायंकाळ किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पहावी लागायची. सुरवातीला औषध विभागात केसपेपर जमा करून घेतले जात होते. दिलेल्या औषधाच्या संगणकावर नोंदी करून घेतल्यावर हे केसपेपर पुन्हा केसपेपर विभागात जमा होत. त्यामुळे पुन्हा उपचारासाठी आल्यावर जुना केसपेपर घेण्यासाठी रुग्णांना रांगा लावाव्या लागत होत्या. त्यातही अनेकांचे केसपेपर गहाळ होत होते. त्यामुळे उपचाराचे रेकॉर्ड राहात नव्हते. यामध्ये सुधारणा करून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर (Dr. Amod Gadikar) यांनी औषध दिल्यानंतर केसपेपर रुग्णाला परत करण्याची पद्धत सुरू केली. त्याचा रुग्णांना फायदा होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी आता केसपेपरही संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केसपेपर विभागात तीन संगणकांसह अन्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून नागरिकांना संगणकीकृत केसपेपर देण्यास सुरवात झाली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला केसपेपर क्रमांक मिळणार आहे. प्रत्येकाचा मिळालेला क्रमांक हा त्याला आयुष्यभरासाठी असणार आहे. त्यामुळे या क्रमांकाच्या आधारेही नागरिक आपला केसपेपर मिळवू शकणार आहे. त्याचबरोबर या उपक्रमामुळे रुग्णालयात रुग्णाच्या उपचाराचे रेकॉर्ड उपलब्ध राहणार आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिक, आरबीएसके योजनेतील लहान मुले व अन्य व्यक्तींना केसपेपर व उपचाराच्या शुल्कामध्ये सूट आहे. त्याची नोंदही योग्य कागदपत्रे दाखविल्यानंतर नागरिकांच्या केसपेपरवर होणार आहे. त्यामुळे याचाही नागरिकांना लाभ होणार आहे.
सुरवातीला नागरिकांची पूर्ण माहिती भरावी लागत असल्याने सध्या केसपेपरसाठी काही वेळ लागत आहे. परंतु, नागरिकांची माहिती अपडेट झाल्यानंतर या यंत्रणेमुळे आधीपेक्षा जलद गतीने केसपेपर मिळणे शक्य होणार आहे. त्यातून सध्या लागणारा कालावधी कमी करण्यासाठी केसपेपर विभागातील संगणकांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नागरिकांची माहिती अपलोड करावी लागत असल्याने संगणकीय प्रक्रियेत केसपेपर मिळण्यास उशीर होत आहे. परंतु, एकदा बहुसंख्य माहिती अपलोड झाल्यावर हा प्रश्न सुटेल. तोपर्यंत नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी ऑफलाइन केसपेपर देण्याचीही सुविधा सुरू ठेवली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.