ब्रिटिशांनी निर्दयीपणे छातीवर गोळ्या झाडल्या अन् काँग्रेस आक्रमक झाली!

kranti din
kranti dinesakal
Updated on

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी ७६ वे वर्ष सुरू झाले आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्यचळवळीच्या स्मृती जागविल्या जात आहेत. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (Indian Congress Party) वतीने आज नऊ सप्टेंबर रोजी वडूज येथे हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्यसैनिक सत्कार समारंभ संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने...

Summary

1942 मध्‍ये काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील अधिवेशनात ‘करो या मरो’ हा ठराव पास करण्यात आला.

१९४२ मध्‍ये काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये ‘करो या मरो’ हा ठराव पास करण्यात आला आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा अंतिम लढा सुरू झाला. ९ ऑगस्‍ट १९४२ रोजी काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनात महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा इशारा दिला आणि देशातील जनतेला आंदोलनाची हाक दिली. काँग्रेस पक्षाचे देशभरातील सर्व कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाची वाटच पाहात होते. मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाने कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. आत्तापर्यंत सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू असलेले स्वातंत्र्य आंदोलन या अधिवेशनानंतर काहीसे आक्रमक रूप धारण करून खेडोपाडी पसरले. महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) आवाहनाला साथ देत त्यावेळी सातारा जिल्‍ह्‍यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी धडक मोर्चे काढणे सुरू केले. चौकाचौकांत तिरंगा झेंडा फडकवण्यात युवकही मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. देशातील सर्वांत मोठे स्वातंत्र्य आंदोलन म्हणून इतिहासात नोंद झालेले सातारचे ‘प्रति सरकार आंदोलन’ हा त्याचाच एक भाग आहे.

kranti din
1942 च्या ब्रिटिशकालीन तुरुंगात आजही भरते झेडपीची 'शाळा'

काँग्रेस पक्षाने नऊ ऑगस्टला मुंबईत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खटाव (जि. सातारा) तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्‍त्‍यांनी ‘हुतात्मा परशुराम घार्गे’ यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. वडगाव (जयराम स्वामी), खटाव, लाडेगाव, पुसेसावळी, वर्धनगड इत्यादी ठिकाणांहून मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते वडूजच्या दिशेने निघाले. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते वडूजच्या बाजार पटांगणावर जमा झाले होते. महात्मा गांधींसह काँग्रेसच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना अटक केल्यामुळे जमाव प्रक्षुब्ध झाला होता. ब्रिटिशांविरोधी घोषणा देत सरकारचा निषेध केला जात होता. खटाव तालुक्यातील काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष परशुराम घार्गे यांनी वडूज कचेरीवर चाल करून जाण्याचे आवाहन उपस्थित जमावाला केले. स्वतः तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन परशुराम घार्गे पुढे निघाले, त्यांच्या मागे हजारो कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले. ‘वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद’च्या घोषणांनी वडूज शहराचे आसमंत व्यापून टाकले. सत्याग्रहींचा अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज कचेरीकडे (तहसील कार्यालय) (Tehsil Office Vaduj) कूच करू लागला.

kranti din
बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

ठिकठिकाणी मोठ्या संख्येने लोक मोर्च्यामध्ये सहभागी होऊ लागले. त्यावेळी बंडीगिरी नावाचा ब्रिटिश प्रशासनातील फौजदार वडूज येथे कार्यरत होता. मोर्चाचे आक्रमक रूप पाहून कचेरीच्या अलीकडील चौकात (सध्या हा चौक हुतात्मा चौक म्हणून ओळखला जातो) मोठी पोलिस फौज उभी करून त्याने हा मोर्चा अडवला. त्यामुळे ब्रिटिशांविरोधी घोषणांचा जोर आणखी वाढला. फौजदार बंडीगिरीने लाठीमार करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर प्रचंड लाठीहल्ला चढवला. त्यामुळे परशुराम घार्गे आणि काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. कोणीही मागे हटायला तयार नव्हते. अत्यंत क्रूर स्वभावाच्या फौजदार बंडीगिरीने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळीबार सुरू झाला तरी काँग्रेस कार्यकर्ते मागे हटत नव्हते. परशुराम घार्गे यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन गोळीबार करणाऱ्या शिपायांकडे आगेकूच सुरू केली. ब्रिटिश फौजदार बंडीगिरी याने अत्यंत निर्दयीपणे थेट परशुराम घार्गे यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या.

हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या मागोमाग धावलेल्या हुतात्मा बलभीम हरी खटावकर (पुसेसावळी), हुतात्मा बाळकृष्ण दिगंबर खटावकर (पुसेसावळी), हुतात्मा आनंदा श्रीपती गायकवाड (ज. वडगाव), हुतात्मा सिधू भिवा पवार (ज. वडगाव), हुतात्मा किसन बाळा भोसले (ज. वडगाव), हुतात्मा खाशाबा मारुती शिंदे (ज. वडगाव), हुतात्मा श्रीरंग भाऊ शिंदे (उंचीठाणे), हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार (ज. वडगाव) या आणखी आठ कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. महात्मा गांधींच्या विचारांनी व ध्येयवादाने प्रेरित झालेले ९ कार्यकर्ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झाले. यातील ठळक गोष्ट म्हणजे छातीवर गोळी लागून जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेतही परशुराम घार्गे यांनी झेंडा जमिनीवर पडू दिला नाही. नोंद अशी आहे की, शरीरात प्राण असेपर्यंत परशुराम घार्गेंच्या हातातील तिरंगा झेंडा उंच फडकत होता.

kranti din
पोलीस दलात कॉन्स्टेबलसह 'एसआय'ची भरती

वडूजसारख्या तुलनेने अगदी छोट्या शहरात गावपातळीवरील सामान्य जनतेने दाखवलेले शौर्य आणि केलेले बलिदान भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. जालियनवाला बागेतील गोळीबारात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ब्रिटिशांच्या थेट गोळीबारात एकाचवेळी नऊ आंदोलकांना प्राण गमवावे लागले, ही अपवादात्मक घटना वडूज येथे घडली आहे. त्यादृष्टीने ९ सप्टेंबर १९४२ च्या वडूज मोर्चाचे महत्त्‍व अनन्यसाधारण आहे. वडूज कचेरीवरील मोर्चात बलिदान दिलेल्या नऊ स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती कायमस्वरूपी नजरेसमोर राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने वडूज येथे ‘हुतात्मा स्मारक’ उभारले आहे. याठिकाणी प्रतिवर्षी ९ सप्टेंबरला शासकीय इतमामात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते (कै.) विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यकर्त्याकडून एक एक रुपया जमा करून वडूज येथे हुतात्मा परशुराम घार्गे यांचा पुतळा बसविला आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी खटाव तालुका काँग्रेस समिती प्रतिवर्षी वडूज येथे कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून, त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यामुळे प्राप्त झालेले अधिकार सदैव जतन करणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.

स्वातंत्र्यचळवळीच्या काळात देशात दृढ झालेले मानवतावादाचे, बंधुभावाचे संस्कार व त्यातून निर्माण झालेली देशाची संघटित शक्ती डळमळीत झाल्याचे सध्याचे चित्र आहे. सत्तेच्या राजकारणासाठी माणसामाणसांतील अंतर वाढविण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. स्वातंत्र्यासाठी जात, धर्म, पंथ व भेदभाव विसरून खांद्याला खांदा लाऊन लढलेल्या एकसंध समाजात फुटीची बीजे रोवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. स्वातंत्र्यचळवळीतून या देशाला मिळालेला नवा विचार आणि संस्कार आपण विसरलो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पुढील काळात यासाठी नवे जनजागृती आंदोलन उभे करण्याची, विशेषतः तरुण पिढीला स्वातंत्र्यपूर्व काळातील खरा भारत समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताचे संविधान, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती आणि देशाची जडणघडण किती महत्प्रयासाने झाली आहे, याचे स्मरण आजच्या युवकांना करून देण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्य भावनेतून स्वतःला या कार्याला जोडून घेणे, हेच स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना अभिवादन ठरेल.

kranti din
साताऱ्यात शुक्रवारी जेल फोड शौर्यदिन

भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना वडूजच्या मोर्चाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्‍व लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेस समितीने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, प्रदेश काँग्रेसचे सचिव रणजित देशमुख स्वागताध्यक्ष आहेत. स्वातंत्र्यचळवळीचा देदीप्यमान इतिहास आणि वडूज मोर्चाचे स्मरण करणे, स्मृती जागवणे हे प्रेरणादायी कार्य आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

-राजेंद्र शेलार, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.