Mhaswad, Satara: सर्वसामान्य शेतकरी व दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कायम आग्रही आहे. या पक्षाची वेगळी ताकद असल्यानेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील काही जागा लढवणार आहे. यात माणची जागा प्राधान्याने लढवणार असून, सामान्य जनतेला नवा पर्याय निर्माण करून देणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यात एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी अरविंद पिसे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेची परिस्थिती बदलण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून आमदार कडू म्हणाले, ‘‘शेतकरी व सामान्यांचे प्रश्न जो सोडवेल, तोच आमचा. आमची बांधिलकी फक्त सामान्य जनतेशी आहे. आजवर या सामान्य जनतेला भूलवण्याचे काम केले गेले आहे. निवडणुका जवळ आल्या, की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जाते; परंतु त्यावर तोडगा कधीच काढला जात नाही.
मागण्या सरकारकडे आहेत. शेतकऱ्यांना किमान त्यांच्या मजुरीचे पैसे तरी हमखास मिळाले पाहिजेत, ही प्रमुख मागणी आहे. शासनाकडून घरकुलासाठी दिल्या जाणाऱ्या सव्वा लाखाच्या अनुदानात घर होत नाही. अशा फसव्या योजनांना विरोध आहे. सामान्य जनतेची कामे जे सरकार करेल, त्यासोबत आम्ही मजबुतीने राहू, मग ते सरकार कोणाचेही असो.’’
आमदार कडू म्हणाले, ‘‘राज्यातील किमान १५ जागा आम्ही लढवणार आहोत. त्याचे नियोजन सुरू आहे. आमच्यासाठी आकडे महत्त्वाचे नसून सामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी कोण काम करते, हे महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत युती करण्यास अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, आमची रणनीती ठरली आहे.’’
अरविंद पिसे हेच संभाव्य उमेदवार
माणची जागा आम्ही लढणार असून, या मतदारसंघात आमच्याकडे एकही स्थानिक स्वराज्य संस्था नसली, तरी येथील सामान्य जनता आमच्यासोबत असल्याचे सांगून आमदार कडू म्हणाले, ‘‘या भागातील प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आमच्याकडे आहे. म्हसवड येथील अरविंद पिसे हेच आमचे अंतिम उमेदवार आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.