कारखान्यानं 160 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचं गाळप केलंय.
कऱ्हाड (सातारा) : शेवाळेवाडी-म्हासोली (जि. सातारा) येथील अथणी शुगर्स-रयत साखर कारखान्यानं (Athani Sugars-Rayat Sugar Factory) यंदाच्या गळीत हंगामात १६० दिवसांत कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. उच्चांकी गाळपामुळं माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर (Vilasrao Patil-Undalkar) यांची स्वप्नपूर्ती झालीय.
डोंगरी विभागात कारखानदारी आणून हा भाग सुजलाम् सुफलाम् बनवताना रयत कारखान्यानं पाच लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त ऊस गाळप व शेजारील कारखान्याच्या बरोबरीनं उसाला दर द्यावा, अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक (कै) विलासराव उंडाळकरांची होती. गेली सहा गळीत हंगामात अथणी रयतनं एक एक टप्पा गाठत यावर्षी पाच लाख टन गळीत पार करत काकांची ही स्वप्नपूर्ती केलीय. यानिमित्तानं रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांचे हस्ते युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील यासह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. अॅड. उंडाळकर म्हणाले, अथणी-रयतच्या भागीदारीस यशस्वी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षे पूर्वी कारखाना विक्री करावा लागतो की काय? अशी अवस्था होती. मात्र, त्या अडचणीतून (कै) विलासकाका आणि अथणीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आज रयत कारखाना पूर्णपणे कर्ज मुक्त झालाय.
स्पर्धात्मक ऊस भाव देण्यास सक्षम बनला आहे. काकांनी कारखानदारी उभी करताना शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. यंदा कारखान्याचे पाच लाख मेट्रिक टन गळीत पूर्ण झालं आहे. त्यामध्ये कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. यापुढील काळात कारखान्याची विस्तारवाढ करून कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. युनिट हेड रवींद्र देशमुख म्हणाले, कारखान्यानं १६० दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. १२.२० टक्क्यांनी साखर उतारा राखत सहा लाख नऊ हजार साखर पोत्याचे उत्पादन घेतलं आहे. १५ मार्च पर्यंतची ऊसाची बिले व तोडणी वाहतुकदारांचे वाहतुकीचे पैसेही त्यांना दिले आहेत. अथणी-रयतच्या या यशात संस्थापक (कै) विलासकाका यांनी घालून दिलेले आदर्शवत विचार फार मोलाचे ठरले आहेत. रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड उदयसिंह पाटील, अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स योगेश पाटील, सुशांत पाटील यांचे मार्गदर्शन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं ठरलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.