खेड्यातील मुलांना मोफत ऑनलाइनचे धडे; मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

खेड्यातील मुलांना मोफत ऑनलाइनचे धडे; मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने ते सुरू नाही. काही खासगी शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही पालकांकडे फी मागितली जात आहे. त्याचा विचार करून शिक्षण विभागाने मुंबई महापालिकेतर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषांत सुरू असेल्या स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयसीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थी राजधानीशी कनेक्‍ट होऊ शकणार आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यातूनही काही शिक्षकांनी स्वतः नवीन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाइन शिक्षण सुरू केले. मात्र, खासगी शाळांनी त्यांची शैक्षणिक कार्यवाही ऑनलाइन सुरू ठेवली. त्यांनी आतापर्यंत यंदाच्या नवीन वर्षाचा निम्मा अभ्यासक्रम शिकवून ऑनलाइन परीक्षाही घेतल्या आहेत. 

मात्र, त्याच्या उलट स्थिती जिल्हा परिषद शाळांतील आहे. त्याचा विचार करून त्या शाळेतील मुलेही या ऑनलाइनमध्ये मागे पडू नयेत म्हणून शिक्षण विभागाने मुंबई महापालिकेतर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषांत सुरू असलेल्या स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील खेड्यापाड्यातील, वाडी-वस्तीवरील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकेल. त्यामुळे त्यांना घरच्या घरीच अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. 

...अशी चालते रोज कार्यवाही 
मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषांत सुरू असेल्या स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयसीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम प्रत्येक शालेय दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून 45 मिनिटांच्या दोन तासिका होतात. नववी व दहावीसाठी दररोज सकाळी आठ वाजल्यापासून चार तासिकांचे नियोजन करण्यात येते. त्याचे रेकॉर्डेड भाग विद्यार्थ्यांना BMC EDU MAR, BMC EDU HIN, BMC EDU URD, BMC EDU ENG या नावाने यू ट्यूबवर उपलब्ध करण्यात आले आहेत. 

जॉईन होण्यासाठी हे करा... 
ऑनलाइन वर्गाचे प्रवेश घेण्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळाच्या portal.mcgm.gov.in या मुख्य पृष्ठावर Online admission from for MCGM Schools यावर अर्ज करावा. ऑनलाइन प्रवेश मंजूर झाल्यावर त्यांना ऑनलाइन उपस्थिती दाखवण्यासाठी लिंक व पासवर्ड देण्यात येईल. प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहणे आवश्‍यक राहील. ज्या वर्गात प्रवेश घेतला आहे, त्याच्या मूल्यामापन प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक राहील. ऑनलाइन वर्गातील अध्ययन निष्पत्ती संबंधित प्रगतिपत्रक किंवा उपस्थितीबद्दलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील चार लाखांवर विद्यार्थ्यांना संधी 
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील 11 हजार 224, कऱ्हाड- 82 हजार 800, खंडाळा- 23 हजार 939, खटाव 36 हजार 914, कोरेगाव 31 हजार 942, महाबळेश्वर 16 हजार 68, माण 33 हजार 18, पाटण 33 हजार 228, फलटण 48 हजार 878, सातारा 76 हजार 28 आणि वाईतील 27 हजार 144 अशा 4 लाख 21 हजार 183 विद्यार्थ्यांना मुंबई महापालिकेच्या मोफत ऑनलाइन शिक्षण प्रणालीत सहभागी होण्याची संधी आहे. 

मुंबई महापालिकेतर्फे चार भाषांत आणि तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन शिक्षणाची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी ऑनलाइन सहभागी होऊ शकतात. 
 
प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.