"विष्णू श्री स्मृती' बंगल्यात गांजासदृश वनस्पतीची लागवड; जर्मन युवकांना अटक

"विष्णू श्री स्मृती' बंगल्यात गांजासदृश वनस्पतीची लागवड; जर्मन युवकांना अटक
Updated on

वाई (जि. सातारा) : येथील नंदनवन सोसायटीतील "रो- हाऊस'वर मंगळवारी (ता. 15) रात्री छापा टाकून पोलिसांनी या बंगल्यातील 29 किलो अमली पदार्थाच्या साठ्यासह उत्पादनासाठी वापरलेले साहित्य, दुचाकी, लॅपटॉप, मोबाईल असा आठ लाख 29 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जर्मन युवकांना अटक करण्यात आली आहे. सर्गीस व्हिक्‍टर माणका (वय 31) व सेबेस्टियन स्टेन बुलर (वय 25) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईमुळे वाई परिसरात खळबळ उडाली आहे.
 
याबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्यास माहितीनुसार, वाई शहरात दोन परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानंतर अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी वाईचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नंदनवन सोसायटीतील "विष्णू श्री स्मृती' या बंगल्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी दोन परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे सापडले. पासपोर्ट व व्हिसाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी घराची झडती घेतली. त्या वेळी घरामध्ये व घराच्या गच्चीवर गांजासदृश वनस्पतीची लागवड केल्याचे आढळून आले. ती वेगवेगळ्या प्रकारात होती. त्यासाठी घराच्या गच्चीवर ग्रीन हाऊस उभारण्यात आले होते, तसेच घरात बरण्यांमध्ये अमली पदार्थाचा साठा केल्याचेही निदर्शनास आले. अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील व उपअधीक्षक गणेश केंद्रे (कोरेगाव) यांनी घटनास्थळी भेट दिली. या सर्वांनी घराची पाहणी केल्यानंतर त्या परदेशी युवकांना ताब्यात घेतले गेले.

मुलांचे आरोग्य, ही प्रत्येक आई-वडिलांची काळजी; पाचगणीत गरजूंना मायेची ऊब
 
मंगळवारी सकाळी तज्ज्ञांचा अभिप्राय घेण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक न्याय सहायक प्रयोगशाळेतील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर श्री. खोबरे यांनी नायब तहसीलदार गीतांजली गरड व अन्य शासकीय पंचांसमोर घरातील अमली पदार्थांचा साठा व अन्य साहित्याचा पंचनामा करून तो जप्त केला. त्यामध्ये 29 किलो गांजासदृश वनस्पती, कोकपीट, फ्लॉवर बुस्टर, पॉली हाऊस, एक्‍झोस फॅन, तापमान मोजण्यासाठीचा थर्मामीटर, इनव्हर्टर, तीन लॅपटॉप, तीन मोबाईल, दोन मोटारसायकल अशा मुद्देमालाचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक खोबरे करीत आहेत. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, कृष्णा पवार, विजय शिर्के, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, अक्षय नेवसे, बापूराव मदने, नंदकुमार महाडिक, राठोड, महेश पवार, जिल्हा विशेष शाखेचे हवालदार प्रताप भोसले, विश्‍वास देशमुख, सागर भोसले, सुमित मोरे, संभाजी साळुंखे यांनी भाग घेतला.

संशयितांवर गोव्यातही गुन्हा दाखल
 
दोन्ही संशयितांना अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. या बंगल्याच्या मालकासह परदेशी युवकांना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या संशयितांवर गोवा येथे यापूर्वी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

कारवाईतील महत्वाचे... 

  •  गच्चीवर गांजासदृश वनस्पतीची लागवड 
  •  घरातील बरण्यांमध्ये अमली पदार्थाचा साठा 
  •  29 किलो गांजासदृश वनस्पती जप्त 
  •  लॅपटॉप, मोबाईल, मोटारसायकलही जप्त 
  •  बंगल्याच्या मालकासह मदत करणाऱ्यांचा शोध
     

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.