अत्यंत निर्दयी जमावाने कशाचाही विचार न करता केलेली जाळपोळ, मोडतोड, दगडफेक व त्यांची घोषणाबाजी पुसेसावळीची शांतता भंग करणारी ठरली.
पुसेसावळी : एकाच चौकातून रस्ता कुंभार आळीला, दुसरा रस्ता परीट आळीला जातो. नवभारत असे त्या चौकाचे नाव. त्याच चौकात प्रशस्त प्रार्थनास्थळ आहे. त्यालाही दत्त, हनुमान, सावता माळीसह जैन मंदिराचा वेढा आहे. अशा अत्यंत सलोखा, सामाजिक वातावरण असलेल्या पुसेसावळीतील एकोपा रविवारी रात्री झालेल्या दंगलीत (Pusesawali Riots) जळून खाक झाला.
अधिक महिन्यात तेथील हनुमान मंदिरात (Hanuman Temple) पारायण सोहळा झाला होता. त्या सोहळ्यातील पहिल्या जेवणावळीचा मान मुस्लिम समाजाने (Muslim Community) घेतला होता. त्या स्वादिष्ट जेवणाची चव एक हजार लोकांनी चाखली. त्याच चौकात झालेली दंगल गावाचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणू पाहत आहे. गावातील सलोख्याच्या वातावरणामुळे दंगलीत स्थानिकांचा सहभाग कमी होता, असे साऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे दंगलीसहीत पुसेसावळीला अस्वस्थ करणारा मास्टरमाईंड कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. खटाव तालुक्यातील पुसेसावळी बाजारपेठेचे गाव. गावचा चार हजारांचा उंबरा तर १५ हजारांच्या आसपास लोकसंख्या. गावात अत्यंत शांततेचे नेहमीच वातावरण असते. अलीकडच्या काही काळात गावात शिरलेल्या अपप्रवृत्ती अत्यंत घातक ठरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
त्यात अत्यंत टोकाचा विचार मांडणाऱ्यांकडून त्याला पाठबळ मिळत होते. अखेरीस रविवारी त्या सगळ्याचा उद्रेक झाला. रात्री अंधारात उसळलेल्या दंगलीत सारा गाव भेदरला आहे. दंगलीतील जमावाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर केलेच, त्याशिवाय ठराविक कुटुंबे रात्रभर दहशतीखाली राहिली. अत्यंत निर्दयी जमावाने कशाचाही विचार न करता केलेली जाळपोळ, मोडतोड, दगडफेक व त्यांची घोषणाबाजी पुसेसावळीची शांतता भंग करणारी ठरली.
गावात चार हजार उंबऱ्यांपैकी अल्पसंख्याक समाजाची केवळ १०० घरे आहेत. असे असतानाही त्यांची भीती घालून वाढलेल्या वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार करणारा मास्टरमाईंड बाहेरचा आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. सोशल माध्यमावरील त्या पोस्टचा तपास सुरू असतानाच दंगल घडल्याने त्यामागचा मास्टरमाईंड वेगळा असल्याचे बोलले जात आहे.
गावात येतानाच प्रशस्त दत्त चौक लागतो. त्यानंतर सुरू होते, मुख्य बाजारपेठेतून रस्ता थेट गावात जातो. तेथे वर्षानुवर्षाची मिश्र लोकवस्ती आहे. मात्र, बहुसंख्य व अल्पसंख्याक असा भेदभाव गावात कधीच नव्हता. मात्र, सामाजिक माध्यमांनी गावातील वातावरण ढवळून काढले. काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट पडली. त्या पोस्टबद्दलची चौकशी सुरू असतानाच दंगल घडली.
त्यानंतर गावात सभा झाली अन् तेथून पुढे तुझे-माझे सुरू झाले. ज्या गावात अधिक मास एकत्रित साजरा केला, त्याच गावात हा प्रकार घडला. दंगलीपूर्वी तीनच दिवस आधी काही ठराविकांकडून धोका आहे, अशा आशयाची तक्रार पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांसहीत पोलिसात देण्यात आली होती.
त्याकडे पोलिसांनी फारशा गांभीर्याने पाहिले नाही, त्यामुळे त्याचे दंगलीत रूपांतर झाल्याचे वास्तव आहे. शांत, संयमी व सलोख्याच्या गावातील शांतता कोणाला नको आहे, त्यामागचा मास्टर माईंड कोण आहे? या सगळ्याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक पुसेसावळीकर करत आहेत. त्यामुळे दंगलीमागच्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.
पुसेसावळीत टोकाचा विचार करणारे अत्यंत कमी आहेत, अशा स्थानिक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत. दंगलीनंतरही ज्यांचे नुकसान झाले, ते दहशतीखाली होते. तेही ग्रामस्थ हेच म्हणत होते. जमावात पुसेसावळीतील स्थानिक मुले नव्हती. ती बाहेरची होती. जिल्ह्याच्या विविध भागातून आयात केलेल्यांनी पुसेसावळीत दंगल घडवली, असेही स्थानिकांचे ठाम मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.