शिवेंद्रसिंहराजेंच्या मनातील उमेदवार कोण? या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी चेहऱ्यावर हास्य आणत उमेदवार कोण, हे राज्यस्तरातील महायुतीचे नेते ठरवतील, असे सांगितले.
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Loksabha Elections) जिल्ह्यातील महायुतीतील घटक पक्षांची मोट बांधली असून, लोकसभेसाठी सातारा व माढा मतदारसंघातील उमेदवार कोण, जागा कोणाला? हा विषय राज्याच्या नेतृत्वाचा आहे. जो उमेदवार दिला जाईल, त्याला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आज महायुतीच्या बैठकीत करण्यात आला. येत्या रविवारी गांधी मैदानावर मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) पूर्वसंध्येला होणाऱ्या महामेळाव्यात लोकसभेचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेस पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे सातारा लोकसभा संघटक सुनील काटकर, रयत क्रांतीचे सचिन नलवडे, डॉ. प्रिया शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे ४५ प्लस अधिक खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या नेतृत्वाकडून महायुतीतील ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्या उमेदवाराला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यात येईल. त्यासाठी गांधी मैदानावर येत्या रविवारी महायुतीच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून आम्ही लोकसभेचे रणसिंग फुंकणार आहोत.
जिल्ह्यात महायुती ज्या पद्धतीने एकत्र आहे, तशीच ती बूथ पातळीवरही एकत्र असल्याचे दाखवून दिले जाणार आहे. महायुतीचा सरकारने गेल्या पावणे दोन वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही या मेळाव्यात मांडण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सातारा व माढ्यातील खासदार निवडून आणण्याचा चंग आम्ही बांधला आहे.’’ मेळाव्यासाठी गांधी मैदानच का निवडले? याविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, ‘‘अद्याप लोकसभेची हलगी, नगारे वाजायचे आहेत; पण आम्ही महायुतीत जिल्ह्यात एकविचाराने चालत आहोत, हे दाखवून दिले जाणार आहे.’’
युती निवडणुकीपर्यंत टिकणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आतापासूनच नकारघंटा वाजवू नका. ज्या पक्षाला ही जागा सुटेल, त्यांच्या उमेदवारांचे काम आम्ही सर्वजण करणार आहोत.’’ सध्या विकसित भारत संकल्प यात्रेला काही तालुक्यांत विरोध होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘यासाठी काही घटक नकारात्मक दृष्टीने या यात्रेकडे बघत आहेत. त्यांनी नेमका कशासाठी विरोध केला? याचा शोध घेऊन त्यांची समजूत काढू,’’ असे सांगितले.
शिवेंद्रसिंहराजेंच्या मनातील उमेदवार कोण? या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी चेहऱ्यावर हास्य आणत उमेदवार कोण, हे राज्यस्तरातील महायुतीचे नेते ठरवतील, असे सांगितले. दोन्ही राजे एकत्र केव्हापासून आले आहेत? या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘दोन्ही राजे पूर्वीपासून एकत्र आहेत, तुम्हाला ते माहीत नाही.’’ तर आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘अद्याप कोणताही उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे महायुती म्हणून सर्वजण एकत्रितपणे काम करत आहोत. जो उमेदवार दिला जाईल, त्याला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचे काम केले जाईल, त्यामुळे उमेदवार कोण असेल, हा आता विषय नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.