कऱ्हाड : लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार बंद राहिले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या. मात्र, या कोरोनाच्या लॉकडाउन काळामध्ये बचत गटांच्या महिलांना मात्र "अच्छे दिन' आले. कोरोनामुळे संसर्ग टाळण्यासाठी मास्कची अत्यंत गरज आहे. तीच गरज ओळखून बचत गटांच्या महिलांनी मास्क तयार करून त्याची विक्री केली. त्यातून जिल्ह्यातील 386 गटांतील एक हजार 268 महिलांनी एक लाख 91 हजार मास्क तयार करून त्याची विक्री केली. त्यातून त्यांनी एक कोटी 31 लाखांवर पैसे कमवले आहेत. त्यातून त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी पाऊल टाकले आहे.
मास्कला अचानक मागणी वाढल्याने काही कालावधीत मास्क मिळणेही कठीण बनले होते. एरवी मेडिकलमध्ये कोपऱ्यात पडलेल्या मास्कला अचानक मोठी मागणी झाली. त्याचा विचार करून जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षतर्फे मास्क तयार करायला प्रोत्साहित करण्याचे काम जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे महिलांना चालना मिळाली. त्या विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती व अन्य ठिकाणी महिलांना मास्क विक्रीसाठीचीही व्यवस्था करून दिली. त्यामुळे महिलांना त्याचा चांगला फायदा झाला.
लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष
त्याअंतर्गत जिल्ह्यातील 386 महिला बचत गटांतील एक हजार 268 महिलांनी एक लाख 91 हजार 581 मास्क तयार केले. त्यातून त्यांना एक कोटी 31 लाख 39 हजार 776 रुपये मिळाले आहेत. त्यांनी ते मास्क ग्रामपंचायती, विविध संस्था, व्यावयासिक, दुकानदार, मेडिकल, पालिका यांसह अन्य शासकीय कार्यालयांतून त्याची विक्री केली. त्यामुळे बचत गटांच्या महिलांना लॉकडाउनमध्येही "अच्छे दिन' आले.
पुस्तक वाचा, आम्हाला कळवा! पुस्तकांच्या गावचा अभिनव उपक्रम -
कोरोना काळात मास्कची अत्यंत गरज आहे. ती गरज ओळखून बचत गटांच्या महिलांना आमच्या विभागाने प्रोत्साहित केले. मास्क विक्रीची व्यवस्था केली. त्यातून महिलांच्या हाताला काम मिळून कोटींवर उलाढाल झाली.''
- अविनाश फडतरे, प्रकल्प संचालक, सातारा