आता सॅनिटरी नॅपकिन मिळणार फक्त पाच रुपयांत!

आता सॅनिटरी नॅपकिन मिळणार फक्त पाच रुपयांत!
Updated on

सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिलांना घरबसल्या सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जागर अस्मितेच्या अभियानास प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत ११ तालुक्यांमध्ये एक हजार ६५ गटांना बुकिंगसाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. बचत गटांनी प्रत्यक्षात उद्दिष्टापेक्षा जास्त सहभाग नोंदवत अस्मिता प्लस अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केले आहे. १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यानचे हे रिचार्ज राज्यात पाचव्या क्रमांकावर पोहचले आहेत. या उपक्रमांतर्गत कमी किमतीत कोठेही सहजपणे महिला, शाळकरी मुलींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार असल्याचे माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी दिली. 

महिलांचे आरोग्य सुरक्षितता व जाणीव जागृतीसाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी आपल्या आरोग्याची चांगल्या पध्दतीने काळजी घ्यावी या उद्देशाने शासनाने महिला व शाळकरी मुलींना कमी किमतीत अनुदानावर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावेत यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने तयार केलेल्या अस्मिता प्लस अॅपच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या या उपक्रमांतर्गत एक हजार ६६ महिला बचत गटांना आगावू नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात उद्दिष्टापेक्षा जास्त बचतगटांनी सहभाग नोंदवला असल्याचे फडतरे यांनी सांगितले. अस्मिता प्लस अॅपच्या माध्यमातून आगावू नोंदणी केल्यानंतर सर्वसाधारण २० दिवसांमध्ये सॅनिटरी नॅपकिन त्या गटापर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. हे सॅनिटरी नॅपकिन दोन प्रकारचे येणार आहेत.

यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित प्रकार आहेत. विनाअनुदानित प्रकारात बचत गटांना गावातील किंवा गावाबाहेरील महिलांना २४ रुपयांना ८ नॅपकिनचे पॅड विकता येणार आहे. अनुदानित नॅपकिनसाठी जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुली लाभार्थी आहेत. या वयोगटातील मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. त्यांची जन्मतारखेप्रमाणे यादी घेतली असून आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्यांची नोंदणी सुरु आहे. नोंदणीनंतर मुलीच्या नावाचे कार्ड तयार तयार करुन कार्डच्या माध्यमातून हे नॅपकिन त्या मुलींना देण्यात येणार आहेत.

शाळकरी मुलींना आठ नॅपकिनचे पॅड फक्त पाच रुपयांना मिळणार असल्याची माहिती फडतरे यांनी दिली. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून अस्मिता प्लस  हे सॅनिटरी नॅपकिन माफक दरामध्ये माताभगिनींना उपलब्ध करून देणे आहे. त्याचप्रमाणे, स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना माफक दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून विक्रीमधून उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

लोकसंख्या जास्त असणा-या गावात होणार दोन गटांची निवड
जागर अस्मितेच्या मोहिमेत जास्तीत-जास्त गटांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे राज्यव्यापी ऑनलाईन महिला उद्बोधन मेळावाही घेण्यात आला आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती आणून बचत गटांना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध करून देणे हाही या अभियानाचा हेतू आहे. तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या गावात दोन गटांची निवड केली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित या प्रकारे सॅनिटरी नॅपकिन बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी फक्त मेडिकल दुकानात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होत होते. आता किराणा दुकान, महिला टेलर, मिरची कांडप केंद्र, पिठाची गिरणी, भाजीपाला केंद्र अशा ठिकाणीही ते उपलब्ध होणार आहेत.
-अविनाश फडतरे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.