येथील बस स्थानकाचे बांधकाम सुरवातीला ठेका कोणी घ्यायचा?, त्यानंतर कोरोना व लॉकडाउनमुळे रेंगाळले आहे.
म्हसवड (सातारा): राज्य परिवहन महामंडळाने एक तपापूर्वी म्हसवड, तासगाव व शिर्डी येथील नवीन बस स्थानक बांधकामांच्या निविदा एकाच वेळी काढल्या होत्या. प्रथम तासगाव, त्यापाठोपाठ शिर्डी बस स्थानकाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण झाले. परंतु, येथील बस स्थानकाचे बांधकाम सुरवातीला ठेका कोणी घ्यायचा?, त्यानंतर कोरोना व लॉकडाउनमुळे रेंगाळले आहे.
सात वर्षांपूर्वी म्हणजे ११ सप्टेंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही तास आधी येथील नवीन बस स्थानक इमारतीचे भूमिपूजन माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी संबंधित बांधकामाचा ठेका घेतलेल्या नाशिक येथील ठेकेदाराच्या उपस्थितीत थाटात आटोपला. विधानसभा निवडणुका पार पडताच बांधकाम सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु, पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लोटूनही बस स्थानकाचे बांधकाम सुरू केले गेले नाही.
दरम्यानच्या कालावधीत या बस स्थानकाचा ठेकेदार बदलून मिरज येथील ठेकेदारास गतवर्षी बांधकाम देण्यात आले. जुन्या बस स्थानकाची इमारत पूर्णत: पाडून त्या जागी नवीन इमारत बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनाच्या साथीचे संकट व लॉकडाउनमुळे हे बांधकाम गेली दीड वर्षे पुन्हा रेंगाळले आहे. कोरोनाच्या साथीतही खासगी व इतर शासकीय बांधकामे सुरू ठेवण्यास शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिलेली होती. असे असतानाही संबंधित ठेकेदार या रेंगाळलेल्या बांधकामाकडे फिरकलाच नाही. सध्या शासनाने लॉकडाउनमध्ये पुन्हा शिथिलता दिली असूनही या बस स्थानकाचे बांधकाम ‘जैसे थे’ तसेच अपूर्ण अवस्थेत बंद आहे.
येथील बस स्थानकातून पूर्व दिशेतील हैदराबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परळी-वैजनाथ, अक्कलकोट, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज, सांगोला इत्यादी शहरे व गावाकडे एसटीची नियमित प्रवासी वाहतूक सुरू आहे. तर पश्चिमेकडे महाबळेश्वर, मेढा, सातारा, कोरेगाव, पुसेगाव, वडूज, दहिवडी, दक्षिणेस मायणी, विटा, तासगाव, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, तर उत्तरेस फलटण, पुणे, चिंचवड, मुंबई, ठाणे, वसई, बारामती, नातेपुते इत्यादी गावे व शहरांकडे नियमित एसटीने प्रवाशांची ये-जा मोठ्या संख्येने असते.
ऐन पावसाळ्यात प्रचंड गैरसोय
म्हसवडचे जुने बस स्थानक पाडून त्या जागी सुरू झालेले नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम रेंगाळल्यामुळे प्रवासी व मुक्कामी असणाऱ्या एसटी गाड्यांसही पुरेशी व सुरक्षित अशी निवाऱ्याची जागाच राहिली नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात बसचालक, वाहकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.